Chhatrapati Sambhaji Nagar News : 10 लाख रुपये मोजा आणि वनरक्षक व्हा. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासवाल्यांनीच ही ऑफर दिली आहे. वनरक्षक भरती परिक्षेत पास करुन देणा-या या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राज्यात वनविभागाच्या अंतर्गत 2 हजार 138 वनरक्षक पदांची भरती सुरू आहे. मात्र, पैसे देऊन ही परिक्षा पास करण्याचा मोठा घोटाळा पोलिसांनी उघडकीस आणला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एक मोठा घोटाळा झाला आहे.वनरक्षक भरतीत हा घोटाळा झाला आहे. वनरक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष दाखवत चार परीक्षार्थींकडून प्रत्येकी 10 लाख रूपये उकळले गेले. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. उमेदवारांची सर्व ओरिजिनल कागदपत्र ताब्यात घेत सह्या असलेले 10 लाखांचे कोरे चेक घेतल्याचं समोर आले आहे.
10 लाख रुपयांमध्ये हमखास परीक्षा पास करुन देणार असं आश्वासन या आरोपींनी दिलं होते. त्याची हमी घेतली होती अकादमीच्या संचालकांनी. अकादमी संचालकांनी त्यासाठी एका एजंटचीही निवड केली. आरोपी एजंट विद्यार्थ्यांना हेरायचा आणि अकादमी संचालकांसोबत मांडवली करुन द्यायचा. मात्र, पोलिसांनी या आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे.
सातारा खटावच्या बाळू मामा अकादमीचा संचालक अण्णाजी काकडे, सांगलीच्या मानसी अकादमीचा संचालक अनिल कांबळे, छत्रपती संभाजीनगरच्या नव स्वराज्य अकादमीचा संचालक संदीप भुतेकर आणि या सर्व घोटाळ्यातला एजंट अमोल निचड या सर्वांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी एजंट, अकादमी संचालक आणि विद्यार्थ्यांचं मोबाईल संभाषणही पुरावे म्हणून जप्त केले आहेत. हे अकादमी संचालक 5 विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. मात्र यापेक्षा मोठा आकडा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
वनरक्षक भरतीमध्ये फोनवरून उमेदवाराला उत्तरे सांगणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश काहीच दिवसांआधी करण्यात आला होता. वनरक्षक पदभरतीच्या पेपरची प्रश्नपत्रिका व्हॉटस्ॲपवर मागवत नंतर त्याची उत्तरं सांगण्यासाठी एका अकादमीच्या संचालकाने चौघांची नेमणूक केली होती. त्यांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये दिल्याचंही समोर आलं होते.
छत्रपती संभाजीनगरमधला हा पहिलाच घोटाळा नाही. तर याआधी आरोग्य भरती, म्हाडा, पोलीस भरतीमध्येही घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं होतं. आता वनरक्षक पदाच्या भरतीमध्येही छत्रपती संभाजीनगरमध्ये घोटाळा झाल्याचा पर्दाफाश झाला आहे. चार घोटाळे एकट्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उघड झालेत. तेव्हा या भरती परिक्षांवरच प्रश्नचिन्ह उभं राहिले आहे.