योगेश खरे / नाशिक : सध्या बिंगो रोलेटने (Bingo Roullete) तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे. कमी कष्टात पैसे मिळवण्याच्या नादात अनेक तरुण देशोधडीला लागलेत. एकाला तर आपला जीव गमवावा लागला. काय आहे हा बिंगो रोलेट प्रकार? ( Bingo Roulette's youth crazy)
नामदेव चव्हाण नावाचा तरुण. त्र्यंबकेश्वरच्या अंजनेरी परिसरातल्या बेजे फाट्यावर राहणाऱ्या या तरुणानं आत्महत्या करून आपलं जीवन संपवले. कारण बिंगो रोलेट नावाच्या ऑनलाईन जुगाराचा नाद त्याला लागला होता. घरात होता नव्हता तेवढा सगळा पैसा त्यानं बिंगो रोलेटमध्ये गुंतवला. जिंकण्याच्या आमिषानं त्याची उधारी वाढत वाढत 25 लाखांवर गेली. अखेर बिंगो रोलेट चालकांच्या वसुलीच्या दहशतीमुळे त्यानं आत्महत्या केली.
बिंगो रोलेट नावाच्या ऑनलाईन जुगारामुळं तरुण पिढी उद्ध्वस्त#BingoRoulette pic.twitter.com/SKMXXQMpjq
— ZEE २४ तास (@zee24taasnews) February 2, 2021
बिंगो रोलेटप्रमाणेच ऑनलाइन रमी तसंच ऑनलाइन सट्टा अशा जुगारांनी तरुणांना अक्षरशः वेड लावले आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या नादात अनेक तरुणांना आपली घरदारं देखील विकावी लागली, अशा अवैध धंद्यांवर पोलिसांनी आळा घालावा, अशी मागणी होत आहे.
त्र्यंबकेश्वरसारख्या तीर्थस्थळाच्या गावातली तरुण पिढी जुगारात गुरफटलीय. या जुगारानं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आता गरज आहे ती अशा तरुणांना भानावर आणण्याची.