Ajit Pawar On CM Post Forumula: माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतीस्थळ असलेल्या प्रितिसंगमावर आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या वेळी अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. महायुतीला मिळालेल्या मोठ्या यशानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा काही फॉर्म्युला ठरला आहे का? या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलं.
"सीएम पदाचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे का?" असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जरा चिडतच क्षणाचाही विलंब न लावता, "काही नाही, आम्ही तिघे बसू आणि ठरवू! काही फॉर्म्युला वगैरे काही नाही," असं उत्तर दिलं. अजित पवार बोलत असतानाच अन्य एका पत्रकाराने, "देवेंद्र फडणवीसांना वाढता पाठिंबा मिळतोय," असं म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता अजित पवारांनी त्याला त्यांच्या खास शैलीमध्ये, "ऐका तरी, तू मध्येच दुसराच प्रश्न काढता," असं म्हणत शाब्दिक चिमटा काढला.
मुख्यमंत्री निवडण्यासंदर्भात बोलताना अजित पवारांनी, "काल माझी निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली. सर्व अधिकार मला दिली. एकनाथ शिंदेंकडेही त्यांच्या पक्षाने सर्व अधिकार दिले आहेत. भाजपाची नेता निवड वगैरे ठरेल. त्यानंतर आम्ही एकमेकांशी, आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करु," असं सांगितलं. तसेच पुढे बोलताना, "राज्याला अतिशय मजबूत असं स्थिर सरकार मिळालं आहे. खूप अपेक्षा वाढलेल्या आहेत. या कारकिर्दीमध्ये जेवढ्या निवडणुका झाल्यात केंद्रात 222 पर्यंत गेलेल्या. आज तो आकडा 232 पर्यंत पोहचला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात युती किंवा आघाडीला एवढं यश मिळाल्याचं पाहायला मिळालं आहे. आम्ही योजना चांगल्या दिल्या. केंद्राने चांगली मदत केली. लाभ देणाऱ्या योजना दिल्या. विकासकामांवर परिणाम न होता महिला, शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न आम्ही केला. जात-पात, धर्म, भेदभाव आम्ही योजना देताना केला नाही. सर्वांना योजनांचा लाभ दिला," असं अजित पवार म्हणाले.
तसेच लाडक्या बहिणींनी आम्हाला भरपूर मतं दिली. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे, असं अजित पवारांनी अगदी हात जोडून सांगितलं.