विशाल करोळे / औरंगाबाद : विधान परिषद निवडणुकीत मराठवाडा पदवीधर मतदारसंघात भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागले आहे. जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला थेट रामराम करत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. तर बीडचे पंकजा मुंडे समर्थक, भाजप नेते रमेश पोकळे यांनीही बंडखोरी कायम ठेवली आहे.
मराठवाडा पदवीधर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने शिरीष बोराळकरांना उमेदवारी दिली आणि भाजपमधली बंडखोरी उफाळून आली. यापैकी प्रवीण घुगेंची बंडखोरी भाजपने कशीबशी शमवली. पण अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना भाजपचे ज्येष्ठ नेते जयसिंगराव गायकवाड यांनी पक्षाला रामराम ठोकत, दंड थोपटले आहेत. भाजपला संपवणार आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला निवडून आणणार, अशी घोषणाच त्यांनी केली. दरम्यानस गायकवाड यांच्या आव्हानानंतर पंकजा मुंडे यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली.
तर दुसरीकडं पंकजा मुंडेंचे कट्टर समर्थक असलेले रमेश पोकळे यांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न ज्येष्ठ नेत्यांनी केला, पण तो निष्फळ ठरला. अपक्ष म्हणून निवडणूक लढवून भाजपला हरवण्याचा चंगच पोकळे यांनी बांधला आहे.
गायकवाड आणि रमेश पोकळे यांच्याऐवजी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असलेले शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली. पंकजा मुंडे यांनी आधीच त्याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता उघडपणे बंडखोरी झाल्याने भाजपच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.