Bogus Crop Insurance scam in maharashtra : अलिकडेच राज्यात काही भागात शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा उतरवल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. अस्तित्वात नसलेल्या किंवा लागवड केली नसताना पीक दाखवून विमा लाटल्याचा प्रकार घडला होता. 2023 मध्ये शिंदे सरकारने एक रुपयात पीक विमा योजना आणली होती. मात्र या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
तत्कालीन कृषीमंत्री अर्थात धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात 7000 हजार हेक्टरवर घोटाळा झालाय. या सर्व पिकविम्याचे सेंटर परळी असून पीकविमा घोटाळ्याचा हा नवा परळी पॅटर्न समोर आल्याची टीका भाजप धस यांनी केली आहे. भाजपचे नेते सुरेश धस यांनी मुंडेंवर निशाणा साधत सरकारचीच कोंडी केली आहे.
2023मध्ये सरकारकडून एक रुपयात विमा योजनेची घोषणा करण्यात आली होती. केवळ एक रुपयात विमा मिळत असल्याने शेतकऱ्यांनी शासनाकडे खोट्या माहितीचे अर्ज भरले होते. लागवड केली नसतानाही कागदोपत्री फळबागांची नोंद दाखवली गेली. राज्यातील 73, 787 शेतकऱ्यांनी पिकविम्याचे अर्ज भरले होते. त्यातील 10,500 अर्जदारांच्या बागा फक्त कागदावर होत्या.
सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत या घोटाळ्याबाबत तक्रार केली आहे. मी परळी तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना दोष देत नाही. मात्र या योजनेचा गैरफायदा घेण्यात आला, आणि यात त्यावेळेच्या कृषीमंत्र्यांचा हात होता असा आरोप सुरेश धस यांनी केला. धस यांनी यावेळी स्पष्टपणे धनंजय मुंडे यांचं नाव घेणं टाळलं. मात्र तत्कालीन कृषीमंत्री म्हणत अप्रत्यक्षपणे मुंडेंवर निशाणाच साधला आहे.