नागपूर : नागपूरच्या अजनी रेल्वे स्थानकासमोरील सरकारी वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात काडतुसं आढळलीत.
अजनी रेल्वे स्थानकासमोर मेडिकल रुग्णालयाच्या शासकीय वसाहतीच्या मागच्या बाजूस असलेल्या नाल्यात ही दीडशे काडतुसं सापडलीत. यापैंकी काही जिवंत काडतुसं असल्याचंही समजतंय. ही काडतुसं पॉइंट टू - टू असल्याची माहिती मिळतेय.
या वसाहतीत मेडिकलच्या विद्यार्थ्यांना एनसीसीचे प्रशिक्षण देणारे सैन्यातील अधिकारी बी. के. श्रीवास्तव राहत होते. मात्र, श्रीवास्तव यांची आसामला बदली झाल्याने २५ मे रोजी त्यांनी हे घर रिकामं केलं. यावेळी या वसाहतीत दुरुस्ती कामासाठी आलेल्या कामगारांना नाल्यात ही काडतुसं आढळलीत.
यावेळी जमिनीवर पडलेली काही काडतुसं लहान मुलांनी खेळण्यासाठी नेल्याचंही सांगण्यात येतंय. मात्र, रिकामे आणि जिवंत काडतुसं यांची योग्य विल्हेवाट न लावता गटारात का टाकण्यात आलीत? याचा पोलीस तपास करत आहेत.