लैलेश बारगजे, झी मीडिया
अहमदनगरः महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे असं सतत सांगितले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अंधश्रद्धेतून (Superstition) घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गुप्त धनाचे अमिष दाखवून किंवा आजार बरा करुन देण्याच्या बहाण्याने गुन्हे घडत असल्याचे समोर आलं आहे. पारनेर पोलिसांनी (Police) अशाच एका भोंदू बाबाचा डाव उधळला आहे. (Ahmednagar Crime News)
पारनेर पोलिसांनी काळ्या जादूच्या नावाखाली आजार बरे करण्याचे अमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार करून 5 लाख रूपयांची फसवणुक करणाऱ्या भोंदू बाबाला अटक केली आहे. योगी महादेवनाथ बाबा उर्फ ज्ञानदेव तुकाराम कांबळे असे पकडण्यात आलेल्या भोंदू बाबाचे नाव आहे. या भोंदूबाबाने देवऋषी असल्याचे भासवून पारनेर तालुक्यातील एका कुटुंबियाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला.
भोंदूबाबाने कुटुंबातील सदस्यांना घरातील अडचणींचे निवारण करण्यासाठी होम हवन करण्यास सांगितले. तसंच, त्यासाठी पाच लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन फसवणूक केली. तसंच, त्याच घरातील महिलेवर लैंगिक अत्याचार केले आहेत. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भोंदू बाबा विरूद्ध पारनेर पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा, नरबळी, ईतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. शिवाय या भोंदू बाबाने आणखी किती जणांची फसवणूक केली आहे. याचा तपास करत आहेत.
निफाड तालुक्यात आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करुन बरे करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अतिप्रशंग करण्याचा प्रकार समोर आला होता. आजारपण दूर करण्यासाठी ती एका भोंदूबाबाकडे गेली होती. आजारी महिलेला जादूटोणा आणि उतारा करून आजार बरे करून देण्याचं आश्वासन भोंदुबाबाने दिले. तिथे गेल्यावर त्याने एका महिलेवर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवले. महिलेच्या तक्रारीनंतर ही संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
दरम्यान, यवतमाळमध्येही असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोट दुखीमुळं नवजात बाळ सतत रडत असल्याने पालकांनी मुलीच्या पोटावर चटके दिल्याची घटना घडली आहे. अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मुलीच्या आई-वडिलांनी मुलगी सतत रडतेय म्हणून त्यांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता गावातील लोकांनी सांगितलेल्या अघोरी प्रकाराचा प्रयोग केला आहे. पालकांनी पाच दिवसांच्या बाळाच्या पोटावर बिब्बा गरम करून त्याचे चटके दिले. मात्र या अमानवीय प्रयोगामुळे बाळाची प्रकृती अधिकच चिंताजनक झाली.