आजोबांनी घेतलेले कर्ज तीन पिढ्यांनाही फेडता येईना; तरुण शेतकऱ्याने उचललं आत्महत्येचं पाऊल

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरु आहे. अशातच आता आजोबांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम भरता भरता एक अख्ख कुटुंब संपलं आहे.

आकाश नेटके | Updated: Oct 13, 2023, 01:22 PM IST
आजोबांनी घेतलेले कर्ज तीन पिढ्यांनाही फेडता येईना; तरुण शेतकऱ्याने उचललं आत्महत्येचं पाऊल title=

विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळी परिस्थिती... मराठवाड्यातील (Marathwada) शेती ही गेल्या कित्येक वर्षांपासून अशाच बेभरवशाच्या पावसावर अवलंबून आहे. याचा मोठा फटका तिथल्या शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीसाठी कर्ज (Farmer Loan) काढलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या जीव देऊन कर्जाची रक्कम परतफेड करण्याची परिस्थिती मराठवाड्यात उद्भवली आहे. शेतकऱ्यांना घेतलेल्या कर्जाची परतफेड करता येत नसल्याने आत्महत्येसारखी पावलं उचलावी लागत आहेत. अशाच एका दाहक वास्तवाची हादरवणारी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून (chhatrapati sambhaji nagar) समोर आली आहे.

कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या गरीब शेतकरी कुटुंबाची अक्षरश: वाताहत झाल्याचे अत्यंत हृदयद्रावक वास्तव छत्रपती संभाजीनगरातून पुढं आले आहे. 15 वर्षांपूर्वी घेतलेल्या दीड लाखाची परतफेड होत नसल्याने तिघांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. दीड लाखांच्या कर्जापायी एकाच घरातील तिघांचे बळी गेले आहेत. दीड लाखांचे कर्ज गेल्या 15 वर्षातही फेडता येत नसल्याचे दाहक वास्तव समोर आल्यानंतर सर्वांनाच हादरवून सोडलं आहे.
 
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ गावाची ही घटना आहे.. सततची नापिकी आणि तब्बल 15 वर्षांपूर्वी आजोबांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नसल्याने सोमनाथ भोसले या 30 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. वडील आणि भावाने याच कर्जाच्या चक्रात आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी सोमनाथवर येऊन पडलेली होती. मात्र कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत तो गेल्या महिन्यापासून वावरत होता. याच विवंचनेतून शेतकरी सोमनाथ पंडित भोसले याने घराजवळील शेतात बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. खाजगी फायनान्स कंपनीकडून सोमनाथच्या आजोबांनी घेतले होते. मात्र त्याची परतफेड होत नसल्याने भोसले कुटुंबातील तिघांना आत्महत्या करावी लागली आहे.

या कर्जाच्या जाचापायी 2008 मध्ये वडील पंडित भोसले तर 2019 मध्ये मोठा भाऊ गजानन भोसले यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर आता घरातील कर्त्याधर्त्या सोमनाथनेही आत्महत्येचं पाऊल उचललं.