पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या पूजेचा मान मिळेल - मुख्यमंत्री

 जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रार्थना.

Updated: Jul 12, 2019, 10:26 AM IST
पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या पूजेचा मान मिळेल - मुख्यमंत्री   title=
छाया सौजन्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ट्विटर वॉल

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या वर्षी पुन्हा विठुरायाच्या पूजेचा मान मिळेल, अशी आशा व्यक्त केली. यामुळे पुढचा मुख्यमंत्री भाजपचा होईल या चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे. विठ्ठल तसेच विठ्ठलरुपी जनतेचे आशीर्वाद गेल्या वेळी मिळाले होते, याही वेळी मिळतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. त्याचेवळी जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. बळीराजा आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे, अशी विठ्ठलाच्या चरणी त्यांनी प्रार्थना केली.  

पंचामृताचा अभिषेक

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरात भक्तीचा पूर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते पंढपुरात आज पहाटे विठ्ठल-रुक्मीणीची शासकीय महापूजा झाली. पहाटे अडीचच्या सुमारास पायावर पंचामृताचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाला नवे वस्त्र परिधान करण्यात आले. चंदनाचा टीळा लावल्यानंतर देवालाला भगरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर रुक्मिणी मातेची पूजा झाली. शासकीय पूजा झाल्यानंतर वारकऱ्यांना विठ्ठर-रखुमाईचे मंदिर दर्शनासाठी खूले करण्यात आले. यावेळी वारीने महाराष्ट्रधर्म जिवंत ठेवला, आपली संस्कृती टिकवून ठेवली. वारी हा सकारात्मक शक्तीचा आविष्कार आहे. वारीची शिस्त वाखाणण्यासारखी असते. मंदिर समितीने अनेक नव्या सुविधा निर्माण केल्या, त्यांचे अभिनंदन, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत.

या वारकरी दाम्पत्याला मिळाला मान

गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्यात येते. यावेळी मुख्यमंत्र्यांसह पूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळतो. विठ्ठलाची पूजा करण्याचा मान यंदा सलग चार दशके वारी करणाऱ्या लातूरच्या शेतकऱ्याला मिळाला आहे. ६१ वर्षीय विठ्ठल मारूती चव्हाण आणि सौ. प्रयाग विठ्ठल चव्हाण यांना मानाचा वारकरी होण्याची संधी मिळाली. त्यांचे मूळ गाव सांगवी, सुनेगाव तांडा आहे. विठ्ठल चव्हाण हे दहा वर्षे उपसरपंच होते. तसेच सध्या तंटामुक्त समितीचे सदस्य आहेत. चव्हाण हे १९८० पासून पंढरपूरची वारी करत आहेत. 

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे 

शासकीय महापूजेनंतर मंदिर प्रशासनाकडून मुख्यमंत्री, मानाचे वारकरी आणि इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला आणि विठुरायाकडे साकडे घातलं. शेतकरी सुजलाम् सुफलाम व्हावा, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठुरायाच्या चरणी केली. जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. बळीराजा आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना! , असे ट्विट मुख्यमंत्र्यांनी केले आहे.