मुंबई : महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आजही ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस आहे. कोकण, खान्देश आणि विदर्भातल्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे.
रायगडमधल्या महाड, अलिबाग, पेण, नागोठणे, खोपोलीमध्ये पावसाचा शिडकावा झाला. तर बीडमध्ये माजलगाव, वडवणी भागात पाऊस झाल्यानं काढणीला आलेल्या गहू, ज्वारीचं नुकसान झालंय. जळगाव, धुळे, नंदुरबारसह विदर्भातल्या भंडारा, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्येही ढगाळ वातावरण आहे. आज महाराष्ट्रातल्या कोकण, मध्य महाराष्ट्रातला काही भाग तसंच मराठवाड्यातल्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवसही हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे.
कडक उन्हानंतर सध्या मुंबईसह राज्यभरात ब-याच ठिकाणी ढगाळ हवामान दिसून येतंय. कोकणात आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस पडला आहे. या बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांची जळजळ तसंच खोकला हे आजार बळावू शकतात. हवामानात होणा-या वारंवार बदलामुळे प्रतिकार शक्ती कमी होऊन साथीच्या आजारांना आपलं शरीर बळी पडू शकतं असं डॉक्टरांनी सांगितलंय. त्यामुळे हे आजार टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणं, अंगावर ताप काढणं टाळणं, बाहेरचे खाद्यपदार्थ खाणं टाळणं, तसंच उन्हात जाताना काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलंय..त्याचबरोबर लहान मुलं आणि वृद्धांची विशेष काळजी घेणंही गरजेचं असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय.
ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी पडलेल्या अवकाळी पावसामुळं कोकणातील आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यातच वेधशाळेकडून येत्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. त्यामुळं प्रशासनानं सतर्कतेचा, सावधानतेचा आणि सुरक्षिततेचा इशारा दिलाय. एकुणच कोकणातल्या आंबा बागायतदारांच्या मागे निसर्गाचं शुक्लकाष्ठ लागलंय. गेल्या चार वर्षात अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे आंबा उत्पादक शेतकरी पुरता हैराण झालाय. बुधवारपासून रत्नागिरी जिल्ह्यात पुन्हा ढगाळ वातावरण आहे. लांजा आणि राजापूर तालुक्यात पावसानं काल हजेरी लावली. काही ठिकाणी गाराही पडल्या. त्यामुळं आंबा बागायतदारांच्या तोंडचं पाणी पळालंय. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती व्यक्त केली जातेय.