भंडारा : लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी मतदान झाल्यानंतर धानाला मिळणारा बोनस, तसंच कीडरोगाबाबतची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. भंडारा जिल्ह्यात भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत ते बोलत होते. निवडणूक आचारसंहितेमुळे शेतकऱ्यांचे पैसे रखडले असल्याचं त्यांनी यावेळी मान्य केलं... दरम्यान धान उत्पादकांना डिसेंबर २०१७ च्या हिवाळी अधिवेशनात जाहीर केलेली मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ लागल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आचार संहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आज निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या धानाला लागलेला तुडतुडा तसंच त्यांना मिळणार बोनस निवडणुकीनंतर त्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सभेत दिलं होतं. यानंतर रात्री उशिरापर्यंत भंडारा इथल्या जिल्हा कोषागार सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.
राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी विचारणा केली असता शेतकऱ्यांना मिळणारी मदत ही येत्या दोन दिवसांत त्यांच्या खात्यात वळविण्यात येणार असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आलंय. ही सगळी खेळी मतदारांना आकर्षित करण्यासाठी असून आचार संहितेचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिलीय.