FIR Against Chhagan Bhujbal : राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. मराठा संघटना भुजबळांविरोधात आक्रमक झाल्या आहेत. दादरच्या शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये भुजबळांविरोधात तक्रार दाखल झाली आहे. भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे भुजबळ यांना सहकाऱ्यांकडून देखील विरोधाचा सामना करावा लागत आहे.
मराठा संघटना भुजबळांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सकल मराठा समाजानं चिथावणीखोर भाषा वापरल्याचा आरोप करत भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ओबीसी नेते धमक्या देत असल्याचा आरोपही या तक्रारीत करण्यात आला आहे.
मनोज जरांगेंनी आता थेट छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. भुजबळ दंगली घडवण्याची भाषा करत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. तर आमदारांची घरं कोणी पेटवली, असा सवाल भुजबळांनी जरांगेंना केला आहे.
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा जुंपलीय. भुजबळांचा आयुष्यभर विदूषकपणा सुरु आहे अशी टीका मनोज जरांगेंनी केली. तर पोलिसांनी एकमेकांना मारलं हे जरांगेंनी म्हणणं हा विदुषकपणा असल्याचा पलटवार भुजबळांनी केलाय.
छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांनी आज एकमेकांची अक्कल काढली. जाळायला नाही, तर जोडायला अक्कल लागते अशा शब्दांत भुजबळांनी जरांगेंवर हल्ला चढवला. तर, जोडायला अक्कल लागते, आधी नाही कळलं? असा उलटसवाल जरांगेंनी केला.. मराठ्यांनी तुम्हाला जोडलं, मोठं केलं. मात्र तुम्ही त्यांना तोडलं, असा पलटवार जरांगेंनी केला.
ओबीसी समाजातील संत आणि राष्ट्रपुरूषांची लायकी नव्हती का? असं म्हणत छगन भुजबळांनी मनोज जरांगेच्या टीकेला उत्तर दिलंय. संतांपासून ते राष्ट्रपुरूषांपर्यंतचे दाखले देत मनोज जरांगेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. आम्ही हुशार असतानाही लायकी नसलेल्या लोकांच्या हाताखाली काम करावं लागतंय अशी टीका मनोज जरांगेंनी केली होती. त्याला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय.