अमरावती : मुख्यमंत्र्यांनी खोटारड्या भाषणबाजीतून जनतेला फसविले असून काँग्रेस महापर्दाफाश सभांमधून मुख्यमंत्र्यांची बनवाबनवी उघडकीस आणेल असा ईशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिला. अमरावती येथून काँग्रेसच्या महापर्दाफाश सभांना सुरवात झाली. यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांची लूट करून विमा कंपन्यांना देशात 4000 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेने मात्र पीक विमा कंपनीवर मोर्चा काढण्याऐवजी दुसऱ्याच कार्यालयावर काढल्याची खिल्ली देखील त्यांनी उडविली.
सरकार शेतकरी कामगारांचे नसून भांडवलंदारांचे आहे असे सांगत जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने राज्यात 4000 टँकर सुरू असल्याचा आरोप थोरात यांनी केला. ज्या दिवशी पूरग्रस्त भागात होडी बुडाली त्यावेळी मुख्यमंत्री पालकमंत्री काय करीत होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेतकऱ्यांच्या खिशात पैसा नसल्याने देशात मंदी आली असून या सरकारनं कृषी आधारित अर्थव्यवस्था मोडकळीस आणल्याचा आरोप थोरात यांनी केला. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत 70% शेतकरी वंचित राहिले असून राज्यात काँग्रेस चं सरकार आल्यास 6 महिन्याच्या आत शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशी घोषणा माणिकराव ठाकरे यांनी केली.
विदर्भाच्या नावावर निवडून आलेल्या फडणवीस सरकारने विदर्भाचा अनुशेष मात्र दूर केला नाही, एकही उद्योग विदर्भात आणला नाही, त्यामुळे करंट्या लोकांना मुख्यमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नाही असा प्रहार नितीन राऊत यांनी केला.
तर राज्याची तिजोरी खाली करून मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरू असल्याचे टीकास्त्र नाना पटोले यांनी सोडले. मुख्यमंत्री कार्यालयात आरएसएस च्या लोकांना नेमणुका देऊन सरकारी पगार लाटल्या जात असून, मुख्यमंत्री जनतेला वाऱ्यावर सोडून जनतेच्या पैश्यांची उधळपट्टी करून पुन्हा सत्ता हस्तगत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्यात कामगारांना वाटप करण्यात येत असलेल्या किट वाटपात भ्रष्टाचार
होत असून मुख्यमंत्री सह सर्व मंत्री घोटाळेबाज आहेत.
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेत घोटाळा होत असून प्रवाश्यांचे दररोज 67 लाख रु मातोश्रीवर पाठविले जात असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी सरकारी विभागाचे खाते अक्सिस बँकेत वळविल्याने त्यांच्या पत्नी अक्सिस बँकेच्या व्हाईस प्रेसिडेंट झाल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.