औरंगाबाद : कोरोनाचा फैलाव आटोक्यात असला तरी रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेण्याची गरज आहे. मास्क परिधान करण्यावर भर द्या तसेच हात साबणाने तसेच सॅनिटायझर करावेत, असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. कोरोना लस कधी बाजारात येणार हे अद्याप माहीत नाही. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मोफत लस उपलब्ध करुन देणार असल्याचे जाहीर केले आहे.
महाराष्ट्रातील जनतेला कोरोनावरची लस मोफत देणार, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. बिहारमध्ये मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे देशाच्या इतर लोकांवर हा अन्याय असल्याचे मत मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे.
खरं तर योग्य वेळी देशाच्या सीमा बंद केल्या असत्या तर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळला असता आणि लॉकडाऊन सुद्धा करावे लागले नसते, दरम्यान केंद्राने जरी नाही दिली तरी महाराष्ट्रात कोरोनाची लस नागरिकांना मोफतच देण्यात येईल, अशी माहिती मंत्री नवाब मलिक यांनी औरंगाबादेत पत्रकारांना दिली.
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे. यावरुन काँग्रेस आणि शिवसेनेने भाजपवर हल्लाबोल चढवला आहे. भाजपने जाहीरनाम्यात कोरोना लस मोफत देण्याची घोषणा केलीय. यावरून आता कांग्रेसने टीका केली आहे. हा तर टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार असल्याचे मत बिहारमध्ये प्रचार करणारे सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केले आहे.
कोरोना लस मोफत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. भाजपचा हा टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही खेळी केली आहे. आरोग्य व्यवस्था सुधारणे, मोफत औषध उपलब्ध करून देणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे. मात्र, मोदींनी बिहारसाठी घोषणा केलेले २० लाख कोटी कुठे गेले, असा सवालही सत्यजीत तांबे यांनी केला आहे.