क्रेडिट कार्ड घेताय सावधान! होऊ शकते अशी फसवणूक

तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर किंवा घेण्याचा विचार करत असाल तर सावधान. तुमची फसवणूक होऊ शकते ती कशी आणि काय आहे घोटाळा जाणून घ्या.

Updated: Feb 25, 2021, 01:13 PM IST
क्रेडिट कार्ड घेताय सावधान! होऊ शकते अशी फसवणूक title=

पिंपरी-चिंचवड: उधारी करण्यापेक्षा काही कालावधीसाठी आपल्याला थोडे जास्त पैसे वापरायला मिळाले तर कुणाला नको असतात. या अपेक्षेने अनेकजण क्रेडिट कार्ड घेतात. मात्र त्याची बऱ्याचवेळा कोणतीही नीट माहिती घेत नाहीत अशा वेळी आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर किंवा घेण्याचा विचार करत असाल तर सावधान. तुमची फसवणूक होऊ शकते ती कशी आणि काय आहे घोटाळा जाणून घ्या.

तुम्ही क्रेडिट कार्ड घेत असाल तर जरा सावधान! ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण हिंजवडीतल्या एका नामांकित आयटी कंपनी मध्ये काम करणा-या कर्मचाऱ्याची क्रेडिट कार्ड घेतल्यानंतर फसवणूक झाली. 

प्रखर अग्रवाल असं या कर्मचाऱ्याचं नाव असून एकदा कार्डवरून खरेदी केल्यावर काही दिवसातंच त्यांचं क्रेडिट कार्ड बंद झालं. आर. बी. एल या बँकेच्या आकर्षक योजनांमुळे त्याने हे क्रेडिट कार्ड घेतलं होतं. त्यानंतर मात्र एका महिलेचा फोन आला आणि प्रखरची सगळी माहिती तिने बरोबर सांगत त्याच्या मोबाईल वर पॉप अप लिंक पाठवली. 

प्रखरने त्या लिंकवर क्लिक केल्यावर महिलेने त्याचा जी मेल हॅक करून ओटीपी नंबर घेत त्याच्या अकाउंट वरून दोन लाख रुपये काढले.  सायबर सेल आणि ग्राहक पंचायतीकडे याबाबत तक्रार करण्यात आली. कार्ड घेण्यासाठी बँकेक़डे दिलेली माहिती कुणी पुरवत नाहीत ना याबाबत तपास केला जात आहे.

फ्रॉड करणाऱ्याकडे माहिती गेलीच कशी, अगदी कार्ड नंबर पासून, केलेल्या व्यवहारांची तंतोतंत माहिती गेली कशी हा प्रश्न प्रखरला पडला आहे. यामध्ये बँकेचे कुणी कर्मचारी तर सहभागी नाही ना असा प्रश्न उपस्तिथ केला जात आहे. 

पोलिसांनी ही शक्यता नाकारली नसून या मध्ये सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. बँकेतले कुणी या मध्ये सहभागी आहे का याचा ही तपास केला जाईल असं सायबर सेलकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.