Maharashtra Weather News : धुकं, गारठा असूनही फेब्रुवारीत पारा 37 अंशांवर; ऐन उन्हाळ्यात काय अवस्था होणार?

Maharashtra Weather News : हवामानाचा धडकी भरवणारा अंदाज. उन्हाचा दाह दिवसागणिक तीव्र होत असून, राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच पारा चाळीशीच्या दिशेनं...   

सायली पाटील | Updated: Feb 6, 2025, 07:37 AM IST
Maharashtra Weather News : धुकं, गारठा असूनही फेब्रुवारीत पारा 37 अंशांवर; ऐन उन्हाळ्यात काय अवस्था होणार?  title=
Maharashtra Weather news Summer entering in state as temprature rises

Maharashtra Weather News : देशात प्रामुख्यानं उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम असला तरीही मध्य भारत आणि महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमधून मात्र थंडी माघार घेताना दिसत आहे. परिणामी राज्यात कमाल आणि किमान तापमानाचा आकडा सातत्यानं वाढताना दिसत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये तापमान 36 अंशांवर पोहोचलं असून, सध्या सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला इथं करण्यात आली आहे. जिथं, पारा 37 अंशांवर पोहोचला होता. 

राज्यात एकिकडे पारा चाळीशीच्या दिशेनं अतिशय वेगानं झुकताना दिसतोय तर दुसरीकडे येत्या काही दिवसांमध्ये कमाल आणि किमान तापमानाचा आकडा सातत्यानं वाढणार असल्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील हवामानावर सध्या गुजरातच्या उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम होत असून, अरबी समुद्रात सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळल्यामुळं ढगाळ वातावरणही पुन्हा पूर्ववत होताना दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच ही परिस्थिती असताना आता प्रत्यक्ष मार्च, एप्रिल आणि त्यातही मे महिन्यात हवामानाची, उन्हाळ्याची आणखी किती रौद्र रुपं पाहायला मिळणार याच चिंतेत आता भर पडली आहे. 

हेसुद्धा वाचा : Delhi Election EXIT Poll: भाजपा 27 वर्षांचा दुष्काळ संपवणार की आपची हॅट्ट्रिक होणार? एक्झिट पोलने स्पष्ट केलं चित्र

पुढील 24 तासांमध्ये विदर्भासह राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी क्षेत्र इथं पहाटेचा गारठा वगळता उर्वरित दिवस मात्र उष्मा जाणवणार आहे. येत्या 48 तासांमध्ये हा उष्मा आणखी तीव्र होण्याचा प्राथमिक अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 

दरम्यान, देशाच्या उत्तरेकडे हवामानाच मोठे बदल अपेक्षित असून सक्रिय होऊ पाहणारे दोन पश्चिमी झंझावात यामागचं मुख्य कारण ठरतील. चालू आठवड्याची अखेर याच बदलांनी होणार असून, जम्मू काश्मीर, लडाख इथं याचा सर्वाधिक परिणाम दिसून येईल. जोरदार हिमवृष्टी, कडाक्याची थंडी आणि हिमाचल प्रदेशात पावसाची हजेरी असं एकंदर चित्र देशाच्या उत्तरेकडे पाहायला मिळेल.