'...तर तुम्ही मूर्ख आहात'; भारताचा उल्लेख करत पीटरसनचं विधान! म्हणाला, 'भारताने पैसा...'

Kevin Pietersen On India: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होण्याच्या आधीच पीटरसनने हे विधान केलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 6, 2025, 09:09 AM IST
'...तर तुम्ही मूर्ख आहात'; भारताचा उल्लेख करत पीटरसनचं विधान! म्हणाला, 'भारताने पैसा...' title=
पीटरसन स्पष्टच बोलला

Kevin Pietersen On India: इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने भारतासंदर्भात एक सूचक विधान केलं आहे. भारताने इंग्लंडमधील 'द हंड्रेड' स्पर्धेतील संघांमध्ये केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात पीटरसनने हे विधान केलं आहे. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धेत भारतातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. यामध्ये अनेक भारतीय गुंतवणुकदारांबरोबरच इंडियन प्रिमिअर लीग म्हणजेच आयपीएलमधील मालकांचाही समावेश आहे. त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या 'द हंड्रेड'च्या लिलावामध्ये वेगवेगळ्या संघांमध्ये गुंतवणूक केली आहे. पीटरसनने याच गोष्टीकडे लक्ष वेधलं आहे.

पीटरसन म्हणतो एकदा हे पाहाच

भारताचा जागतिक क्रिकेटवर मोठा दबदबा असून भारताने इंग्लंडमधील 'द हंड्रेड' स्पर्धेत गुंतवणूक केल्याने इंग्लंड क्रिकेट सर्कलमध्ये मोठ्याप्रमाणात पैसा ओतला जाईल अशी अपेक्षा पीटरसनने व्यक्त केली आहे. "भारत जागतिक क्रिकेटचा कारभार चालवत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एक नंबरचे मूर्ख आहात. याविरोधात कोणी बोलत असेल तर त्याला समज नाही असं म्हणावं लागेल.भारत जागतिक क्रिकेटसाठी जे जे काही करतोय ते पहायचं असेल तर मागील काही आठवड्यांमध्ये इंग्लिश क्रिकेटमध्ये भारताने पैसा गुंतवलेला आहे तो एकदा पाहाच. हे सारं फार भन्नाट आहे. इंग्लीश क्रिकेसाठी हे फारच फायद्याचं आहे," असं पीटरसनने या स्पर्धेसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात म्हटल्याचं वृत्त आहे.

दक्षिण आफ्रिकेचं दिलं उदाहरण

पीटरसनने दक्षिण आफ्रिकेतील एसए20 या स्पर्धेबद्दलही भाष्य केलं. या स्पर्धेतील एकूण सहा संघांपैकी सर्वच संघांचे सहमालक हे आयपीएलमधील आहेत. 44 वर्षीय पीटरसनने भारताबरोबर संलग्न झाल्याने एसए20 प्रमाणे 'द हंड्रेड' स्पर्धाही मोठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. "इंग्लिश क्रिकेटमधील अनेक देश सध्या तग धरुन ठेवण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्यामुळे सध्या इंग्लिश क्रिकेटमध्ये जे होत आहे ते फारच उत्तम आहे. आता क्रिकेटमध्ये पैसा ओतण्यात आल्याने बराच सकारात्मक फरक पडेल. दक्षिण आफ्रिकेत काय झालं आङे पाहा. मागील आठवड्यात मी दक्षिण आफ्रिकेत होतो एसए20 स्पर्धेनिमित्त. सर्व स्टेडियम खचाखच भरली होती. सर्व संघांची मालकी आयपीएलच्या मालकांकडे आहे. सर्व लोक समाधानी आहेत. ज्या दर्जाचं क्रिकेट खेळवला जात आहे ते उत्तम आहे. त्यामुळे यातून सकारात्मक गोष्टी घडतील," असं पीटरसन म्हणाला.

नक्की वाचा >> Ind v Eng: आज 2166 दिवसांनंतर विदर्भात ODI; कशी असेल Playing XI? किती वाजता सुरु होणार मॅच?

कोणी किती गुंतवणूक केली आहे?

मुंबई इंडियन्सने 'द हंड्रेड'मधील 'ओव्हल इनव्हेंसिबल' संघातील 49 टक्के भागीदारी मागील आठवड्यात विकत घेतली. दुसरीकडे लखनऊ सुपर जायटंसची मालकी असलेल्या संजीव गोयंकांच्या आरपीएसजी समुहाने 3 फेब्रुवारी रोजी याच स्पर्धेतील एका संघात गुंतवणूक केली.