Ind v Eng: आज 2166 दिवसांनंतर विदर्भात ODI; कशी असेल Playing XI? किती वाजता सुरु होणार मॅच?

India vs England Nagpur Match 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून त्यापूर्वी खेळवली जाणारी अंतिम मालिका आजपासून सुरु होत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 6, 2025, 08:04 AM IST
Ind v Eng: आज 2166 दिवसांनंतर विदर्भात ODI; कशी असेल Playing XI? किती वाजता सुरु होणार मॅच? title=
आज पहिला एकदिवसीय सामना (प्रातिनिधिक फोटो)

India vs England Nagpur Match 2025: भारत आणि इंग्लंडदरम्यानच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. अवघ्या तीन सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना आज विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (व्हीसीएच्या) जामठा मैदानावर खेळवला जाणार आहे. 19 फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघनिवडीच्या दृष्टीने ही मालिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळेच पहिल्या सामन्यापासूनच या मालिकेकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. विशेष म्हणजे व्हीसीएच्या 'पाटा' खेळपट्टीवर खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील या पहिल्याच सामन्यात धावांचा पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

विराट आणि रोहितकडे विशेष लक्ष

सातत्याने अपयशी ठरत असलेला कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. हे दोघे या मालिकेत कसे खेळतात याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत अपयशी ठरल्यानंतर विराट आणि रोहित हे दोघेही काही दिवसांपूर्वी रणजी स्पर्धेत खेळले होते. मात्र रणजीमध्येही विराट आणि रोहित अपयशी ठरले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोघांचेही वर्चस्व कायम राहिले आहे. आता हेच वर्चस्व दोघे कायम ठेवतात की या फॉरमॅटमध्येही ते भारतीय संघाबरोबरच चाहत्यांची चिंता वाढवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विराट आणि रोहितची दमदार कामगिरी

भारतात 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकात विराट 765 धावांसहीत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला तर याच स्पर्धेत रोहितने 697 धावा केलेल्या. विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर दोघेही श्रीलंकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले. त्यात रोहितने दोन अर्धशतके ठोकली, पण विराट अपयशी ठरल्याचं दिसून आलं. विराटला नावाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. 

कोणत्या ऑल राऊण्डरला मिळणार संधी?

फिरकी गोलंदाजी करणारा आणि फलंदाजीही जमणारा अष्टपैलू खेळाडू निवडण्याचं आव्हान भारतीय संघासमोर असेल. सध्या भारताकडे रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेल यांच्यापैकी कोणाला संधी द्यावी, याबद्दल महत्त्वाचा निर्णय संघ व्यवस्थापनाला घ्यावा लागणार आहे. जडेजा 2023 च्या विश्वचषक अंतिम सामन्यानंतर एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे या तिघांपैकी अक्षरला झुकते माप दिले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मधल्या फळीत आणि विकेटकीपर म्हणून कोणाला मिळू शकते संधी?

विकेटकीपर म्हणून ऋषभ पंतला संधी मिळणार की लोकेश राहुलला हे स्पष्ट झालेले नाही. मात्र राहुलला संधी दिली जाण्याचे संकेत मिळत आहेत. रोहितसोबत उपकर्णधार शुभमन गिल हा सलामीला येईल. त्यानंतर विराट आणि श्रेयस अय्यर व पाचव्या स्थानावर यष्टिरक्षक फलंदाजी करतील असं सांगितलं जात आहे. हार्दिक पांड्या सहाव्या स्थानावर फलंदाजीला येईल. राहुलने विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती तरीही त्याला मधल्या षटकांमध्ये स्ट्राइक रोटेट करण्यात अपयश येत होते. दुसरीकडे पंतची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे तो संघात असल्याच फलंदाजीत विविधता येते. त्याची आक्रमक फटकेबाजीही त्याची जमेची बाजू आहे. ऋषभ आणि राहुल दोघेही अंतिम संघात खेळल्यास श्रेयस अय्यरला बाहेर बसावे लागेल, असं सांगितलं जात आहे.

गोलंदाजांमध्ये कोणाला संधी? 

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना दुखापतीतून सावरल्यानंतर अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळेल असं निश्चित मानलं जात आहे. टी-20 मालिकेत लक्षवेधी कामगिरी करणारा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याला ऐनवेळी संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याला एकदिवसीय सामने खेळवून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याच्या समावेशाची शक्यता तपासली जाऊ शकते. 

इंग्लंडसाठीही मालिका महत्त्वाची

इंग्लंडसाठीही चॅम्पियन्स 2 ट्रॉफीच्या दृष्टीने संघ निश्चित करण्याच्या दृष्टीने ही मालिका महत्तवाची आहे. भारतात दाखल होण्याआधी त्यांनी ऑस्ट्रेलिया आणि विंडीजविरुद्धची मालिका गमावली होती. 

या मैदानावर भारताचा रेकॉर्ड कसा?

नागपूरच्या मैदानावर 2166 दिवसांनंतर एकदिवसीय सामना होत आहे. येथील हा एकूण दहावा एकदिवसीय सामना असून भारताचा सातवा सामना असेल. भारताने येथे पाच सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे. 

संभाव्य भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गील (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, लोकेश राहुल (विकेटकीपर), मोहम्मद शमी, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग

सामना किती वाजता सुरु होणार?

दुपारी 1.30 वाजल्यापासून 

थेट प्रक्षेपण कुठे पाहता येणार?

स्टार स्पोर्टस नेटवर्कवर 

लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

डिस्नी हॉटस्टार