उपासमारीने बिबट्याचा मृत्यू, महिन्याभरातील तिसरी घटना

 महिन्याभरात मृत बिबट्या सापडण्याची संगमेश्‍वर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.

Updated: May 16, 2019, 10:27 PM IST
उपासमारीने बिबट्याचा मृत्यू, महिन्याभरातील तिसरी घटना title=

प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : उपासमारीने अशक्त झालेल्या आणखी एका बिबट्याचा मृत्यू झालाय. हा मृत बिबट्या संगमेश्‍वरजवळच्या भिरकोंड गुरववाडी येथे आज दुपारी मृतावस्थेत सापडला. महिन्याभरात मृत बिबट्या सापडण्याची संगमेश्‍वर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. भिरकोंड गुरववाडीतील गणपत तुकाराम गुरव यांच्या घराजवळ एक बिबट्या झोपलेल्या अवस्थेत काही ग्रामस्थांना दिसला. बिबट्या निपचीत पडल्याने ग्रामस्थांना संशय आला त्यांनी ही खबर पोलिस पाटील सुभाष महादेव गुरव यांना दिली. त्यांनी तत्काळ वनविभाग देवरूखला ही माहिती दिली. सदरचा बिबट्या मृतावस्थेत असल्याचे समजताच बघ्यांनी एकच गर्दी केली. 

दरम्यान चिपळूणचे विभागीय वनाधिकारी विजयराज सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ प्रियांका लगड यांच्यासह देवरूखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नऊ गावडे, कदम आदी कर्मचारी घटनास्थळी पोचले. बिबट्या मृत असल्याची खात्री झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी त्याचे शवविच्छेदन केले. 

गेल्या महिनाभरात बिबट्या मृतावस्थेत सापडण्याचा संगमेश्‍वर तालुक्यातील ही तिसरी घटना आहे.एक महिन्यापूर्वी मौजे असुर्डे येथे भक्षाचा पाठलाग करताना विजेच्या खांबावर चढलेल्या बिबट्याला विजेचा धक्का लागुन तो जागीच मृत्युमुखी पडला होता. त्यानंतर पंधरा दिवसातच तुरळ येथे पाण्याच्या शोधार्थ निघालेल्या बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू ओढवला. यानंतर ही महिनाभरातील तिसरी घटना आज उघडकीस आली. 

तालुक्यात सुरू असलेली बेसुमार जंगलतोड, वारंवार लागणारे वणवे यामुळे उजाड होणारे डोंगर आणि त्यातील संपत चाललेले रानटी प्राणी यामुळे बिबट्यांच्या भक्ष्याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याच कारणामुळे तालुक्यात बिबटे खुलेआम मानवीवस्तीत घुसत आहेत. यातील अनेक बिबटे नाईलाज म्हणून पाळीव प्राण्यांवर हल्ले करताना दिसत आहेत.

याबाबत वनपाल सुरेश उपरे यांनी माहिती देताना सांगितले की, "बिबट्याच्या पोटात अन्नाचा एकही कण नसल्याचे दिसून आले यामुळे अनेक दिवस भुकेने व्याकुळ झालेल्या बिबट्याने प्राण सोडल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या अंगावर कोणत्याही जखमा नव्हत्या. हा बिबट्या मादी जातीचा होता. तो १ वर्षाच्या आतमधील असल्याचे सांगण्यात आले. रितसर कार्यवाही करून त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.'