चंद्रपुरच्या कॉन्व्हेंट शाळेचं व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय; शालेय शिक्षण विभागानं GR काढला

 चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाजवळ असलेल्या घुग्गुस या औद्योगिक शहरात एसीसी सिमेंट कंपनीच्या कामगार पाल्यांसाठी उद्योगाने माउंट कार्मेल या मिशनरी संस्थेला पहिली ते बारावी वर्ग असलेली शाळा चालविण्यासाठी दिली होती. काही वर्षांपूर्वी एसीसी सिमेंटचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे गेले. त्यामुळे ही शाळा देखील अदानी फाउंडेशन द्वारे संचालित करण्याची कारवाई सुरू झाली. 

वनिता कांबळे | Updated: Sep 29, 2024, 08:27 PM IST
चंद्रपुरच्या कॉन्व्हेंट शाळेचं व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाऊंडेशनला देण्याचा निर्णय; शालेय शिक्षण विभागानं GR काढला title=

Chandrapur News :चंद्रपुर मधील माउंट कार्मेल या कॉन्व्हेंट शाळेचं व्यवस्थापन गुजरातच्या अदानी फाउंडेशनकडे देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागानं घेतलाय. यासंदर्भात शालेय शिक्षण विभागानं GR काढलाय. यानिर्यानंतर खासदार संजय राऊतांनी सरकारवर सडकून टीका केलीय. या देशाचं व्यवस्थापनच अदानीकडे आहे. महाराष्ट्र अदानीचा करण्याचा सरकारचा घाट सरकार घालत असल्याच आरोप राऊतांनी केलाय. यावर भाजप आणि सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी राऊतांनी केलीय. तर या निर्णयात चुकीचं काहीही नाही. उद्योग समुहाला शाळा दिल्या जातात. ही एक प्रक्रिया आहे, असं स्पष्टीकरण शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी दिलंय.

या वादानंतर शाळेनंही आपली बाजू मांडली

चंद्रपूर शहराजवळ घुगुस हे औद्योगिक शहर आहे. या शहरात कोळसा खाणी आणि सिमेंट उद्योग आहेत. एसीसी या नामांकित सिमेंट उत्पादक कंपनीचा कारखाना इथे आहे. काही वर्षांपूर्वी अदानी समूहाने एसीसी ची मालकी घेतली. याच उद्योगात असलेली कामगार पाल्यांसाठीची शाळा याआधी मिशनरी संस्था असलेली माउंट कार्मेल संस्था चालवत होती. उद्योगाची मालकी एसीसी कडून अदानी समूहाकडे गेल्यानंतर शाळेचे अदानी फाउंडेशन शाळा असे नामकरण करत त्यासंबंधीचा प्रस्ताव अदानी समूहाने शिक्षण विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार ही उद्योगाच्या ''इन हाऊस'' चालवली जाणारी शाळा अदानी फाउंडेशन ला हस्तांतरित होणार आहे. ही शाळा सरकारी अथवा जिल्हा परिषदेची नाही. याचसंदर्भात अदानी फाउंडेशनने व्यवस्थापकीय बदल करण्यासाठीचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागामार्फत सरकारकडे पाठविला होता. या प्रस्तावानुसार अदानी फाउंडेशन आता या शाळेचे व्यवस्थापन बघणार असून 27 सप्टेंबर रोजी या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने आदेश जारी केला आहे. यात पटसंख्या आणि शिक्षकदायित्व यासंदर्भात अदानी फाउंडेशनला निर्बंध व अटी घालण्यात आल्या आहेत. ही शाळा स्वयं अर्थसहाय्यता प्रकारातील असून ती सरकारी वा जिल्हा परिषदेची नाही. आगामी काळात अदानी फाउंडेशनच्या वतीने या शाळेच्या विकासासाठी प्रकल्प हाती घेतले जाणार असल्याची माहिती प्रकल्पाच्या मानव संसाधन विभागाने दिली आहे

भाजप नेत्याची टीका

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील सिमेंट कंपनीच्या अखत्यारीतील शाळा अदानी समूहाला विकण्याच्या बातमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस नेते खोटा प्रचार करत असून ट्विट करण्यापूर्वी विचार करायला हवा असे मत त्यांनी व्यक्त केले. काँग्रेस दिवस- रात्र खोटं बोलत असून त्यांचा खोटेपणा उघडा पाडणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. एकीकडे अदानी संदर्भात खोटे पसरवायचे आणि दुसरीकडे अदानी -अंबानी यांच्याकडून कामं कुणी घेतली याचा रेकॉर्ड आमच्याकडे असल्याचे बावनकुळे म्हणाले.