मुंबई : रत्नागिरी (Ratnagiri ) जिल्ह्यातील चिपळूण येथील तिवरे धरणग्रस्तांसाठी (Tiware Dam In Ratnagiri ) सिद्धीविनायक न्यासाने दिलेल्या 5 कोटी रुपयांच्या निधीतून बांधलेल्या 24 घरांचे आज लोकार्पण करण्यात आले आहे. त्यांना हक्काचा निवारा मिळत आहे याचे समाधान आहे, यातील उर्वरित धरणग्रस्तांनाही एक वर्षाच्या आत घरे देण्यासाठी लागणाऱ्या 7 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव आणि आराखडा तातडीने पाठवावा, हा निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण (Tiware Dam ) दुर्घटनाग्रस्तांसाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे सिद्धीविनायक न्यासाच्या निधीतून घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे करण्यात आले. या कार्यक्रमाला परिवहनमंत्री तथा पालकमंत्री ॲड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर, खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीच्या तिवरे धरण दुर्घटनाग्रस्तांसाठी अलोरे (ता. चिपळूण) येथे 'सिद्धीविनायक न्यासा'ने बांधून दिलेल्या घरांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ई-लोकार्पण झाले. उर्वरित धरणग्रस्तांनाच्या घरांसाठी लागणाऱ्या ७ कोटींचा प्रस्ताव व आराखडा पाठविण्याचे त्यांनी निर्देश दिले. pic.twitter.com/jgmKF8YKMK
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 2, 2021
आज आपल्या मनात संमिश्र भावना आहेत. एकीकडे दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दुर्देवी लोकांच्या कुटुंबियांविषयी मनात सहवेदना आहे. तर दुसरीकडे बाधितांना त्यांच्या हक्काचा निवारा आपण आज देत आहोत. या आपत्तीच्या प्रसंगात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले त्यात सिद्धीविनायक मंदिर न्यासाचाही सहभाग होता. त्यांनी बाधितांच्या पुनर्वसनासाठी जी मदत केली त्या मदतीमुळे भाविकांनी मंदिरात केलेले दान सत्पात्री लागले आहे, असे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.
कोविड काळात राज्यातील अनेक देवस्थानांनी पुढाकार घेऊन राज्य शासनाला आणि थेट नागरिकांना केलेल्या मदतीचाही यावेळी आवर्जुन उल्लेख केला. मुख्यमंत्री ठाकरे यांनी तिवरे धरणग्रस्तांना नवीन घरे देताना आजूबाजूच्या परिसरात पुन्हा अशा घटना घडणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या.
सिद्धीविनायक मंदिराने या आपत्तीच्या प्रसंगात तिवरे धरणग्रस्तांच्या पाठीशी उभे राहताना त्यांच्या वेदना कमी करण्याचा प्रयत्न केल्याचे अध्यक्ष आदेश बांदेकर म्हणाले. त्यांनी सिद्धीविनायक मंदिर न्यास विविध सामाजिक उपक्रमांसाठी, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रासाठी मदत करत असल्याचेही सांगितले. हा पैसा भाविकांनी मंदिरात दान केलेला पैसा आहे तो राज्यातील नागरिकांच्या मदतीसाठी वापरण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न असल्याचेही बांदेकर यांनी सांगितले.
या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य आणि केंद्राचे मिळून प्रत्येकी 6 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आल्याची, पशुधनाच्या हानीपोटी 3 लाख रुपयांच्या रकमेचे वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.