Devendra Fadnavis In Ratnagiri : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील मंडणगड इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी मंडणगडच्या भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. भाजप कार्यालयात पोहोचल्यावर एका चिमुकल्याने फडणवीसांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं. त्याचा किस्सा एका भाजप कार्यकर्त्याने एक्स पोस्ट करत शेअर केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी भावूक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
गेले दोन दिवस मी, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंडणगड येथे येणार असल्याकारणाने त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनात होतो. त्यामुळं साहजिकच रात्री घरी यायला उशीर व्हायचा. माझा मुलगा वेदांतने विचारलं, बाबा तुला इतका उशीर का होतोय? तर त्याला मी देवेंद्र फडणवीस मंडणगड येथे येणार आहेत असं सांगितले. मग त्यानेही माझ्याजवळ हट्ट केला की, मलाही फडणवीस काकांना भेटायचंय आणि त्यांना फुल द्यायचंय.
रात्री झोपेतही तो 'फडणवीस काकांना भेटायचंय, फडणवीस काकांना भेटायचंय' असं बरळत होता. सकाळी अगदी आठवणीने त्याच्याकडे पुष्पगुच्छ देऊन ठेवला होता. देवेंद्रंना नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम स्थळी यायला थोडा उशीर झाला. कार्यकर्त्यांचीही प्रचंड गर्दी उसळली होती. त्यात प्रचंड ऊनही होते. परंतु कोणत्याही स्थितीत फडणवीस काकांना भेटणार आणि त्यांना फुल देणार या हट्टापायी कसलीही तमा न करता फक्त आईकडे 'फडणवीस काका केव्हा येणार, फडणवीस काका केव्हा येणार' असा जागर सुरू होता.
अंतिमतः देवेंद्रजी कार्यक्रम स्थळी आले. कार्यक्रम संपल्यानंतर ते गाडीत बसायला जात असताना सरतेशेवटी वेदांतने फडणवीस काकांना गाठलंच आणि त्यांना आत्यंतिक प्रेमाने फुल देऊ केले. फडणवीस काकांनीही ते अतिशय आनंदाने स्वीकारले, असा किस्सा शिवांश पाटील यांनी सांगितला.
Cute kid, cute thread !
वेदांत या चिमुकल्याची गोष्ट ऐकून मन भरुन आले.
वेदांतच्या गोड प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद! वेदांतला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद ! @PatilShivash #Ratnagiri #Maharashtra #BJP #konkan #kids https://t.co/kxUGSbD1uI pic.twitter.com/UyJCCdUMMj— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 9, 2023
दरम्यान, शिवांश पाटील यांच्या पोस्टवर देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या रिपोस्टवर करत हा किस्सा शेअर केला अन् चिमुकल्या वेदांतला शुभेच्छा दिल्या. वेदांत या चिमुकल्याची गोष्ट ऐकून मन भरुन आले. वेदांतच्या गोड प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यावेळी त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.