महाराष्ट्र आज एका मातेला मुकला, फडणवीसांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली

सिंधुताई सकपाळ यांचं आज पुण्यात निधन झालं.

Updated: Jan 4, 2022, 11:55 PM IST
महाराष्ट्र आज एका मातेला मुकला, फडणवीसांची सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली title=

मुंबई : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ (Sindhutai sakpal) यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. सर्वच स्तरातून आता त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ही सिंधुताई सकपाळ माई यांना श्रद्धांजली वाहिली आहे. (Devendra Fadnavis pay tribute to sindhutai sakpal)

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, 'वात्सल्यसिंधू, राज्यातील अनेक अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाने आज महाराष्ट्र एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे. मूळ विदर्भात, वर्ध्यात जन्मलेल्या सिंधूताईंचे आयुष्य अतिशय खडतर, पण त्यांनी त्या संघर्षातून समाजातून अव्हेरल्यांसाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.'

'ममता बालसदनच्या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथांना आश्रय दिला. मी मुख्यमंत्री असताना अनेकदा त्या भेटायला येत. या माध्यमातून त्यांच्या कार्याला हातभार लावता आला, याचे समाधान. पण प्रत्येक वेळी ममतापूर्ण आणि अतिशय मायेने त्या विचारपूस करायच्या,हे अधिक स्मरणात आहे.'

'त्यांच्या जाण्याने मनाला अतिशय वेदना होत आहेत. पद्मश्री पुरस्कार, अनेक कामे आंतरराष्ट्रीय पातळीवर केलेली. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील कायम स्मरणात रहावे, असा त्यांचा कनवाळू स्वभाव, मायेने डोक्यावर हात फिरवणे, ममतेने भरभरून आशीर्वाद देणे.'

'महाराष्ट्र आज एका मातेला मुकला आहे. सिंधुताई सपकाळ यांना माझी विनम्र श्रद्धांजली. महाराष्ट्राच्या दुःखात मी सहभागी आहे. ॐ शान्ति.'