सिंधुदुर्ग : चिपी विमानतळासाठी अखेर मुहूर्त सापडलाय. चिपी विमानतळाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. विमानसेवा सुरू झाल्यास यावर्षी आंबा खायला चाकरमानी थेट विमानानं गावी जाऊ शकतील. यावेळी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे नारायण राणे हेसुद्धा या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. राणे आणि शिवसेना नेते एकाच व्यासपीठावर येणार असल्यामुळे वेगळीच राजकीय जुगलबंदी पाहायला मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
आगामी लोकसभा निवडणूक आचार संहिता जाहीर होण्यापूर्वी हे उद्घाटनाचा सोहळा घाईघाईनंच उरकला जात असल्याची टीकाही या कार्यक्रमावर होतेय. यापूर्वी सप्टेंबर २०१८ मध्ये गणेशाची मूर्ती घेऊन एक विमान सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळावर उतरलं आणि या विमानतळाची पहिली हवाई चाचणी यशस्वीपणे पार पडली होती. चेन्नईहून एचडीएल कंपनीच्या खासगी विमान गोवा मार्गे सिंधुदुर्गात दाखल झालं होतं. परंतु, चिपी विमानतळावरील करण्यात आलेली हवाई चाचणी नियमबाह्य असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला होता. तर चाचणी डीजीसीएच्या परवानगीनुसारच, घेतल्याचा दावा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केला होता.
या विमानतळाचा उल्लेख चिपी विमानतळ केला जातोय त्याचं कारण म्हणजे, हे विमानतळ उभं राहिलंय परुळे गावातील 'चिपी वाडी'मध्ये... परुळे गावचाच एक भाग असलेलं चिपी हे पूर्वी एक पठार होतं... हे विमानतळ उभं राहण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत... त्यामुळे या विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिलं जावं, अशी स्थानिक नेत्यांची आणि नागरिकांची मागणी आहे. या विमानतळापासून कुडाळ २४ किमी, तर मालवण १२ किमी अंतरावर आहे. 'कोकणची विकासाकडे वाटचाल' म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जातंय आणि त्याचीच सुरुवात 'चिपी' या छोट्याशा गावातून झालीय.