देशमुख पिता-पुत्रातला वाद चव्हाट्यावर, 'गैरसमजा'ची सारवा-सारव

त्यानंतर आमच्यातला गैरसमज दूर झाला आहे. त्यांनी तक्रारही मागे घेतली आहे असं त्यांनी सांगितलं.

Updated: May 8, 2018, 08:16 PM IST
देशमुख पिता-पुत्रातला वाद चव्हाट्यावर, 'गैरसमजा'ची सारवा-सारव title=

जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : काँग्रेस नेते रणजित देशमुख यांनी त्यांच्या धाकट्या मुलाविरुद्ध दिलेली तक्रार अखेर मागे घेतली. गैरसमजुतीतून हा प्रकार झाल्याचा दावा रणजित देशमुख यांचे चिरंजीव अमोल देशमुख यांनी केला व शेवटी देशमुख कुटुंबियातील वादावर पडदा पडला. ज्येष्ठ काँग्रेस नेते रणजित देशमुख यांनी स्वतःच्याच मुलाविरोधात पोलिसांकडे तक्रार दिल्यावर नागपुरात देशमुख कुटुंबाचे हितचिंतक आणि काँग्रेस कार्यकर्ते रणजित देशमुख यांच्या घरी गोळा होऊ लागले. संध्याकाळी ४ च्या सुमारास दोन्ही पिता पुत्र काही वेळ घराबाहेर सर्वांसमोर आले. तेव्हा त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांना कुटुंबातील भांडण संपल्याचे सांगण्याचे प्रयत्न केले... मात्र, दोघे ही पिता पुत्र एकमेकांशी काही बोलताना दिसले नाही. त्यानंतर रणजित देशमुख कारने दुसरीकडे निघून गेले... तर डॉ. अमोल देशमुख एकटेच पत्रकारांना सामोरे गेले. वडिलांनी आपल्याविरोधात तक्रार दिल्याची माहिती कळताच धक्का बसल्याचं ते म्हणाले. मात्र, गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असावा असं ते म्हणाले.  त्यानंतर आमच्यातला गैरसमज दूर झाला आहे. त्यांनी तक्रारही मागे घेतली आहे असं त्यांनी सांगितलं.

पित्याची पोलिसांत तक्रार

तत्पूर्वी  कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री रणजित देशमुख यांनी त्यांच्या धाकट्या  मुलाविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती.  रणजित देशमुख यांचा नागपुरातील जीपीओ चौकात बंगला आहे... या बंगल्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर लहान मुलगा डॉ अमोल देशमुख यांनी अवैधरित्या कब्जा केल्याचा तक्रारीत उल्लेख केला होता... यामुळे मानसिक त्रास होत असल्याचं ते म्हणाले होते.   

काँग्रेसच्या तिकिटावर २०१४ ची विधानसभा निवडणूक अमोल देशमुख यांनी रामटेक येथून लढवली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता... अमोल देशमुख हे भाजप आमदार आशिष देशमुख यांचे धाकटे बंधू आहेत. रणजित देशमुख यांनी तक्रार मागे घेतल्याने देशमुख कुटुंबियातील वादावर तर पडदा पडला. मात्र रणजित देशमुख यांच्या मनात गैरसमज निर्माण करणारा बाहेरचा कोण? याबाबत अमोल देशमुख यांनी माहिती देण्याचे टाळले.