सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. अनेक शेतकऱ्यांपर्यंत अद्याप सरकारी मदत पोहचलेली नाही. त्यातच पिकविमा कंपनीचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. एका शेताला 26 हजार तर लगतच्या शेताला 173 रुपये पीक विमा देण्यात आला आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची अशीच फसवणूक सुरु आहे (Maharashtra Farmers News).
पिकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली जाते याचा पर्दाफाश झाला आहे. अतिवृष्टी जेव्हा होते तेव्हा परिसरात, मंडळात अतिवृष्टीची नोंद होते. पण पीकविमा कंपनीने मात्र एकमेकांना लागून असलेल्या शेतांसाठीही वेगवेगळा विमा मंजूर केला आहे. असे एक दोन शेतकऱ्यांच्या बाबतीत नव्हे तर एकाच गावात अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत घडले आहे.
नांदेड जिल्ह्यातील कोंढा येथील शेतकरी राजू कदम यांची एक हेक्टर जमीन आहे. त्यांच्या शेतालाच लागून त्यांचा भाऊ सुरेश कदम यांचे एक हेक्टर शेत आहे. मागच्या खरीप हंगामात दोघांनीही सोयाबीन पेरले होते. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने दोघांच्याही शेतातील पिक भुईसपाट झाले. त्यांची शेती असलेल्या मंडळात 87 टक्के नुकसान झाल्याचा अहवाल आहे. त्यांच्या भावाला अतीसृष्टीसाठी 26 हजार 254 रुपये विमा मंजूर झाला आणि त्यांना केवळ 173 रुपये मिळाले आहेत.
अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले असताना भावाच्या शेजारच्या शेताला 26 हजार आणि आपल्याला केवळ 173 रुपये विमा मंजूर झाल्याने कदम अवाक झाले. अतिवृष्टी बाजूच्या शेतात झाली आणि माझ्या शेतात झाली नाही असा कोणता विमा कंपनीचा अजब कारभार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
राजू कदम एकटेच असे शेतकरी नाही तर कोंढा गावातीलच जवळपास 20 शेतकऱ्यांच्या बाबतीत असेच घडले आहे. चांदोजी कदम यांच्या बाबतीतही असेच घडले. त्यांच्या बाजूच्या शेतक-याला अतिवृष्टीसाठी 19 हजार रुपये विमा मंजूर झाला आणि त्यांना केवळ 609 रुपये विमा मंजूर झाला आहे.
अर्धापूर तालुक्यात असंख्य शेतक-र्यांचा बाबतीत असेच घडले. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात सलग आठ ते पंधरा दिवस अतिवृष्टी झाली. मग एका शेतात पाऊस पडला आणि धुरा लागून असलेल्या शेतात पडला नाही हा चमत्कार कसा घडेल. विमा कंपनीच्या या चमत्कारा बद्दल शेतक-र्यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार सर्वांना भेटून तक्रारी केल्या पण आश्वासनाशिवाय त्यांना काही मिळाले नाही. पिकविमा कंपनीने बांधावर न जाता कार्यालयात बसून पंचनामे केल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून येत आहे. आता सरकारने या पीकविमा कंपनीच्या या गौडबंगालाची चौकशी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे गरजेचे आहे.