Garlic Rates : मागील काही महिन्यांमध्ये वाढत्या महागाईचा सामान्यांच्या जीवनावर मोठा परिणाम दिसून आला. खाद्यतेलांच्या दरांपासून अगदी भाजीपाला आणि जेवणात वापरल्या जाणाऱ्या कांदा लसणाच्या दरांनीही सामान्यांना घाम फोडला. आता वर्ष संपता संपता सामान्यांच्याच जीवनावर परिणाम करणारी किंबहुना त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करणारी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी आले लसणाच्या दरांबाबतची.
किरकोळ बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो 400 रुपयांच्याही पलिकडे पोहोचले होते तर घाऊक बाजारात हेच दर साडेतीनशे ते चारशे रुपयांवर पोहोचले होते. लहान बाजारपेठांमध्ये दरांनी आणखी उंची गाठली होती. आता मात्र या लसणाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे.
उपलब्ध माहितीनुसार बुधवारी लसणाच्या दरात प्रतिकिलो 50 रुपयांनी घसरण झाली आहे. यातही चांगल्या दर्जाचा लसूण आता 350 ऐवजी 300 रुपयांनी विकला जात आहे. बाजारपेठांध्ये आता नवीन लसूण दाखल होण्यास सुरुवात झाल्यामुळं हे दर येत्या काळात आणखी कमी होऊन सामान्यांना आणि त्यातही गृहिणींना दिलासा मिळेल असं मत सध्या व्यापाऱ्यांकडून व्यक्त केलं जात आहे.
रम्यान, एकिकडे घाऊक बाजारात प्रतिकिलो लसूण 350 रुपयांवर पोहोचले असते तरीही किरकोळ बाजारात मात्र तो 400 रुपयांनाच विकला जात असल्यामुळं दर चढेच असून आता सुधारित दर कधी लागू होतात याचीच प्रतीक्षा आहे. दरवर्षी साधारण जानेवारी - फेब्रुवारीत नवीन लसणाची आवक होण्यास सुरुवात होते, त्यामुळं नव्या वर्षात लसणाचे दर आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
इथं लसणाचे दर घसरत असतानाच कांद्यालाही चांगला दर मिळत असल्यामुळं आता बाजारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक सुरू झाली आहे. सध्या ओला कांदा बाजारात येत असून, या कांद्याला फार काळ साठवणीत ठेवता येत नसल्यामुळं तो 10 ते 30 रुपये प्रतिकिलो इतक्या दरानं विकला जात आहे.