सोनू भिडे, झी मिडिया, नाशिक : मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक असल्याची बतावणी करून शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून 80 लाखांचा गंडा घालण्यात आला होता. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयीत आरोपी सुशिल भालचंद्र पाटील याला गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
संशयीत आरोपी सुशील पाटील आणि फिर्यादी सुभाष सुरेश चेवले (रा. आनंदवल्ली, गंगापूर रोड) यांची 2021 मध्ये ओळख झाली. सुभाष चेवले हे टेलिकॉमचा व्यवसाय करतात. चेवले यांना नोकरीची गरज होती. यावेळी पाटील याने मी मंत्र्यांचा स्वीय सहाय्यक आहे. तुमच्या तुम्हाला आणि तुमच्या मी शासकीय नोकरी लावून देतो असे सांगितले. यानंतर दोघांमध्ये अनेक वेळा भेटी झाल्या. यावेळी दोघांना शासकीय नोकरी लावून देण्यासाठी पैश्यांची मागणी करण्यात आली. 2021 ते मे 2023 दरम्यान संशयित सुशील पाटील याला नोकरी लावून देण्यासाठी सुभाष चेवले यांनी 80 लाख रुपये दिले. यानंतर त्यांना शासकीय सेवेतील उच्चपदस्थ नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले.
चेवले यांना नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर त्यांनी या उच्चपदस्थ नियुक्ती पत्राची पडताळणी केली. यात हे धक्कादायक बाब समोर आली. हे नियुक्तीपत्र बनावट असल्याच चेवले यांना समजले. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आल. चेवले यांनी संशयित पाटील कडे पैशांची मागणी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल तसेच नेहमी टाळाटाळ केली. यामुळे आपली फसवणूक झाल्याचं चेवले यांच्या लक्षात आल. त्यांनी याबाबत नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात सुशील पाटील यांच्या विरोधात फिर्याद दिली.
संशयित सुनील भालचंद्र पाटील याने यापूर्वी शासकीय नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना फसवले आहे. 2023 मध्ये दोन कोटी 76 लाखांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. धुळे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण, बांधकाम विभाग, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा परिषद, अन्न व औषध प्रशासन आणि वन विभागासह अनेक विभागांमध्ये नोकरीच्या जाहिराती दाखवून अनेकांना फसवले असून त्यांच्याकडून लाखोंची रक्कम उकळली असल्याचं म्हटलं जात आहे.
संशयित सुनील भालचंद्र पाटील याने शासकीय नोकरीस लावून देण्याची बतावणी करून कोणतीही फसवणूक केली असल्यास त्यांनी गंगापूर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.