नितेश महाजन, झी मीडिया, जालना : केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांना त्यांचा बालेकिल्ला अर्थात भोकरदन तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात जोरदार हादरा बसलाय.दानवे यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे तालुकाध्यक्ष असलेले राजेंद्र देशमुख यांच्या ताब्यात असलेली रेणुकाई पिंपळगाव ग्रामपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली असून सिपोरा बाजार,वालसावंगी,पारध या भाजपच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायत देखील महाविकास आघाडीच्या खात्यात जमा झाल्या आहेत. भोकरदन तालुक्यातील दगडवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत दानवे यांच्या थोरल्या कन्या आशा पांडे यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे.
यावेळी भोकरदन तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायती महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांना हादरा बसल्याचे बोलल्या जात आहे.भाजपच्या हातातून निसटलेल्या ग्रामपंचायतीत मतदारांनी भाजपमधील जुने चेहरे बाजूला सारले असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
नवीन चेहऱ्यांना संधी मिळत नसल्याने मतदारांनीच चंग बांधत जुन्यांना घरचा रस्ता दाखवल्याचं बोललं जातंय. ग्रामपंचायत निवडणुकीत गावातील राजकारण, लहान मोठे वाद, विकास कामांना कमी मिळणारा निधी, प्रलंबित असलेली गावातील कामं यावरून मतदारांनी दानवे समर्थकांना नाकारलं असल्याची चर्चा आहे.
तर जाफ्राबाद तालुक्यात १७ ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडल्या असून या निवडणुकीत भाजपच्या ताब्यात १३ ग्रामपंचायती आल्या आहेत. तर राष्ट्रवादीला २ आणि २ ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे जाफ्राबाद तालुक्यातील भाजपचं वर्चस्व कायम असल्याचं सिद्ध झालं आहे.