Hapus Mango Price: उन्हाळा सुरू झाला की चाहुल लागते ती आंब्याची. कोकणातील हापूस आंबे म्हणजे अनेकांचा जीव की प्राण. हापूस आंबा हल्ली बाजारात सहज उपलब्ध होतो. काही ठिकाणी कमी किंमतीतही आंबा विकला जातो. मात्र, अनेकदा हापूस आंब्याचे नाव घेऊन कर्नाटकी आंब्यांची विक्री करतात. जीआय टॅग असलेल्या कोकणच्या अस्सल हापूस आंब्याच्या नावावरुन होणारी फसवणूक रोखण्यासाठी नवीन क्यूआर कोडचा वापर केला जाणार आहे.
कोकण हापूस आंबा उत्पादक आणि विक्रेता सहकारी समितीने जीआय रजिस्टर्ड शेतकऱ्यांसाठी एक कोड उपलब्ध करुन दिला आहे. यामुळं ग्राहकांना समजणार आहे की आंबा हापूस आहे की नाही ते. वाशी एपीएमसी मार्केट हे तंत्रज्ञान अद्याप आलेले नाहीये. मात्र लवकरच हे तंत्रज्ञान येण्याची शक्यता आहे. खरंतर अनेकदा अशा तक्रारी येतात की देवगड हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विकला जात आहे. कोकणच्या देवगड हापूस आंब्याचे महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी डॉ. विवेक भिडे यांच्या नेतृत्वात हापूस उत्पादक संघटनेने दोन वर्षांपूर्वी क्युआर कोड प्रणाली सुरू केली होती. सुरुवातीला यासाठी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. कोडचा पुन्हा वापर करण्याची भीती होती. त्यामुळं या वर्षी पून्हा नवीन कोड तयार करण्यात आले. याचा पुन्हा वापर करण्याची शक्यता खूप कमी आहे.
क्युआर कोडला मोबाइलने स्कॅन करताच आंब्याची एक्सपायरी डेट, पॅकिंग डेट आणि आंब्याचे उत्पादक शेतकऱ्यांची माहिती मिळेल. यात आमराईचे फोटो, गुगल लोकेशन, शेतकऱ्यांचा फोन नंबरसह अन्य सगळी माहितीदेखील असणार आहे.
नवी मुंबईचे आंब्याचे व्यापारी सुनील केवट यांनी म्हटलं आहे की, एपीएमसी फळ बाजारात कोकण हापूस आंब्याची आवक वाढली आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांना क्यु आर कोड मिळाले आहे त्यांची संख्याही कमी आहे. अशातच क्यु आर कोड लावलेले आंबे अद्याप बाजारात आले नाहीयेत.
महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट हापूस आंब्याची आवक रोखण्यासाठी कोकणातच हापूसची ब्रँडिग केली जात आहे. आम्ही एपीएमसी व्यापाऱ्यांना मार्केटिंग विभागातर्फे निर्देश देण्याची मागणी केली आहे. जेणेकरुन शेतकऱ्यांना योग्य भाव मिळेल आणि ग्राहकांना खरा हापूस मिळेल.