जयेश जगड,झी मीडिया,अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात काल रात्री पावसाने जोरदार प्रवेश केला आहे. तालुक्यातील आलेवाडी आणि पणज येथे सध्या नवीन पुलाचे काम सुरु आहे. जोरदार आलेल्या या पावसामुळे हे पूल वाहून गेले आहेत... त्यामुळे अकोट-शेगाव या मार्गावरील वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला असून वाहतूक सकाळपासून बंद आहे. काल अकोट तालुका आणि सातपुड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे येथील नदी-नाल्यांना मोठा पूर आला आहे. तालुक्यातील देवरी फाटा नजीक असलेल्या आलेवाडी गावाजवळ नदीला पूर आल्यामुळे नवीन बांधण्यात आलेला पूल वाहुन गेला आहे.
सध्या नदीला पूर असल्यामुळे अकोट- शेगाव मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. शेगावहून अकोटला किंवा अकोटहुन शेगावला जाण्यासाठी सध्या अकोला मार्ग सुरु आहे. त्याचप्रमाणे तालुक्यातील पणज गावा जवळील बोर्डी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरु आहे.
पावसामुळे नदीवर बांधलेला कच्चा पूल खचून गेला असून यामुळे या पुलावरून जात असलेला एक ट्रक नदीत कोसळला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. जिल्ह्यात अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची काम सुरु आहेत. त्यामुळे या रस्त्यावर चिखल साचला आहे. तर अशा प्रकारच्या हलगर्जीपणामुळे भविष्यात मोठी दुर्घटना येथे घडू शकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.