Heavy Rain in Kolhapur: राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन पूर्णता विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.
श्रीक्षेत्र आदमापुरात तरी मंदिरा बाहेर असणाऱ्या छोट्या व्यापारांचा मोठे नुकसान झाले. येथे झालेला वादळी वारा आणि तुफान पावसामुळे मंडप आणि काही पत्राचे शेड अक्षरशः कागदासारखे उडून गेले. जवळपास 15 ते 20 मिनिटं वादळीवाऱ्यासह पाऊस सुरू होता, त्यामुळे छोटे व्यापारी आपला जीव मुठीत घेऊन व्यवसाय सांभाळण्याचा प्रयत्न करत होतो.
चाकण औद्योगिक क्षेत्रात सलग तिस-या दिवशी वादळी वा-यासह गारपिठने झोडपले. सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वा-यासह गारपिट सुरु झाल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ झाली. तर, दुसरीकडे गारपिठीमुळे मोठ्या उन्हाळी पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
ज्याची सर्वच जण आतुरतेने वाट बघतायत तो मान्सून आता लवकरच दाखल होणार आहे. मान्सून दोन दिवसात अरबी समुद्रात दाखल होणार आहे. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक हवामान आहे. सध्या मान्सूनने संपूर्ण अंदमान निकोबार बेटासह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मजल मारलीय. दोन दिवसांत मान्सून मालदीवमध्ये दाखल होण्याचे संकेत आहेत. मान्सून सध्या अंदमान-निकोबार बेटावर स्थिरावलाय. पुढील दोन दिवसांत तो अरबी समुद्रात दाखल होईल. वातावरण पोषक राहिलं तर अंदाजे 3 ते 4 जूनपर्यंत मान्सून केरळात आणि 10 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात दाखल होऊ शकतो.
राज्यात पुढील 2 दिवस वातावरण ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. तर, पुढील दोन दिवस पुण्यात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार आहे. नैऋत्य मौसमी पाऊस अजूनही पुढे सरकलेला नाही. अरबी समुद्रातून येणाऱ्या वाऱ्यामुळे राज्यात पुढील 2 दिवस वातावरण ढगाळ राहणार असून मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
जळगावातील रावेर तालुक्याला पुन्हा वादळी वा-यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामुळे शेकडो हेक्टर केळीचं नुकसान झाले आहे. खानापूर आणि अहिरवाडी गावातली संपूर्ण केळीबाग उद्ध्वस्त झाली आहेत.