श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ : यवतमाळच्या बोरीअरब येथील विवेक कामकरी यांनी कोंबडीशिवाय अंडी उबविणाऱ्या यंत्राची घरच्या घरी निर्मिती केली असून त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाल्याने त्यांना चांगला नफा मिळण्याची आशा आहे. विवेक कामकरी हे पेट्रोल पंपावर व्यवस्थापक आहेत. त्यांना घरीच छोटे मोठे प्रयोग करायचा छंद आहे. त्यातूनच अंड्यावर कोंबडे न बसविता अल्पखर्चीक इंक्यूबेटर मधून पिल्ले जन्माला घालण्याची किमया त्यांनी करून दाखविली आहे.
आपल्या चिकित्सक बुद्धीचा परिचय देत त्यांनी केवळ एक हजाररुपयांच्या खर्चात थर्माकोल पेटी, टेम्प्रेचर कंट्रोलर आणि 60 वॅटचा लाईट वापर करून घरीच इन्क्युबेटर तयार केले. त्यात ठेवलेल्या अंड्यांना लाईट च्या माध्यमातून विशिष्ठ तापमान देऊन ती उबविण्याचा प्रयोग यशस्वी झाला.
गावरानी आणि इतर जातीच्या कोंबीडीची अंडी यात उबविल्या जातात. 20 दिवसात एकाच वेळी हजारो पिले इंक्युबेटर मधील अंड्यातून जन्माला घालता येतील.
शेतकरी पुत्रांनी या इन्क्युबेटर चा वापर करून घरच्या घरी व्यवसाय केल्यास त्यांना चांगला पूरक रोजगार मिळू शकतो असे विवेक कामकरी यांनी आवाहन केले आहे.