येथे कॉपी विकत मिळेल! औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार उघड

प्रत्येक प्रश्न, उत्तरासाठी १० रूपयांचा दर

Updated: Feb 25, 2019, 02:27 PM IST
येथे कॉपी विकत मिळेल! औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार उघड title=

औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील बोकुळ जळगाव येथे बारावी परिक्षेच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या कॉप्यांची थेट विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रत्येक प्रश्न, उत्तरासाठी १० रूपयांचा दर लावण्यात आला आहे. कॉप्यांवर किती नंबरच्या प्रश्नावर कोणते उत्तर लिहावे हे स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे बारावी परिक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या यंत्रणेचा फज्जा उडालेला असल्याचे स्पष्ट होत आहे.

औरंगाबादमध्ये कॉप्यांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. ऐन परिक्षेत सर्रासपणे विद्यार्थी पैसे देऊन प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विकत घेतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका व्हायरल होऊ नये याचे आदेश देण्यात आले होते. परंतु आता व्हायरल झालेल्या या प्रश्न आणि उत्तरपत्रिकांचा पंचनामा केला जाईल. याबाबत चौकशी करण्यात येईल. चौकशी दरम्यान कोणीही दोषी आढळून आल्यास त्यावर कारवाई केली जाणार असल्याचे औरंगाबाद मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले.

औरंगाबादमधील बारावी परिक्षेचे केंद्र असणाऱ्या शाळेजवळ सर्रास कॉपीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याला शाळा प्रशासनाचा हातभार आहे का? सुरक्षाव्यवस्था पुरेपुर नव्हती का? असे प्रश्न समोर येत आहेत. याप्रकरणी शाळा शिक्षक, पोलीस सर्वांचीच चौकशी केली जाणार आहे. परिक्षेचे केंद्र असणाऱ्या परिसरात परिक्षा काळात ५०० मीटर पर्यंत कोणतेही झेरॉक्सचे दुकान बंद केले जावे असा नियम आहे. परंतु औरंगाबादमध्ये १०० मीटरच्या जवळपासच झेरॉक्सचे दुकान चालू होते.