कोल्हापूर : बेळगाव जिल्ह्यातील चिखलेगाव जवळच्या एका रिसॉर्टमध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि मालेशाप्पा मादीवलाप्पा कलबुर्गी यांच्या हत्येचा कट शिजल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीय. या हत्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सगळ्या संशयितांनी चिखले गावात प्रशिक्षणासाठी हजेरी लावल्याची माहिती समोर येतेय.
इथल्या चिखले गावाजवळ बांधलेल्या एका रिसॉर्टमध्ये हे प्रशिक्षण घेतलं असल्याची माहिती समोर येतेय. निर्मनुष्य असलेल्या या परिसरात घनदाट जंगलात बंदुका चालवण्याचं प्रशिक्षण सगळ्यांनी घेतल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती आलीय.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉ. दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदाराने यापूर्वी दिलेल्या माहितीमध्ये वीरेंद्र तावडे वारंवार बेळगावला जात होते असा उल्लेख होता. त्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील चिखलेगाव हे ठिकाण पुन्हा एकदा तपासयंत्रणांच्या रडारवर आलंय.