अमर काणे झी २४ तास नागपूर : तुमच्या आमच्यासाठी जिव्हाळ्याची बातमी... भारतीय माणूस चालणं विसरलाय, असा धक्कादायक निष्कर्ष एका आंतरराष्ट्रीय विद्यापीठानं काढलाय. भारतीयांचं कमी चालणं त्यांच्या आरोग्याला मारक ठरणार आहे. 'तरुणांचा देश' अशी भारताची ओळख आहे. पण आरोग्य आणि व्यायामाविषयी भारतीय फारसे जागरुक नाहीत. भारतीय लोकं चालणं विसरल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. अमेरिकेतल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठानं केलेल्या अभ्यासानुसार भारतीय लोकांचं चालणं अतिशय कमी झालंय. भारतीय माणूस सरासरी ४ हजार ६०६ पावलंच चालत असल्याचं समोर आलंय. त्यातही धक्कादायक माहिती म्हणजे भारतीय महिला ३ हजार ८८४ पावलं चालतात. जगातल्या ४६ देशातील ७० हजार लोकांच्या दैनंदिन हालचालींचा अभ्यास केल्यावर ही माहिती समोर आलीय.
कमी हालचाली करणं किंवा न चालण्याचे अनेक दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात. चालणं कमी असणाऱ्यांचं वजन वाढतं. पचनसंस्थाही कमजोर होते. मधुमेह, उच्च-रक्तदाबासारखे आजारही होण्याचा धोका असतो. माणसाची कार्यक्षमता कमी होते, असं वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. पिनाक दांडे यांनी म्हटलंय.
चालणं हा माणसासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. त्यामुळं रोज किमान ४५ मिनिटं चाललंच पाहिजे. चालणं टाळणाऱ्या भारतीयांमध्ये मधुमेहाचं वाढतं प्रमाणही लक्षणीय आहे. भारतीयांनी वेळीच चालण्याचा वेग वाढवला नाही. तर आपला देश आजारी लोकांचा देश होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळं दररोज वेळ मिळेल तसं चालायला लागा.