Pune Corona: राज्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसतेय. अशातच कोरोनाचा नवीन व्हेरिएंट JN.1 च्या रूग्णांमध्येही दिवसेंदिवस वाढ होतेय. JN.1 च्या सर्वाधिक रुग्णांची नोंद पुण्यात झाली आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 250 वर पोहोचल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे यातील तब्बल 150 रुग्ण पुण्यातील आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात गेल्या 24 तासांत JN.1 च्या 59 रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात JN.1 या सब व्हेरिएंट पहिला रुग्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळून आला होता. यानंतर पुण्यासह ठाण्यात देखील या सब व्हेरिएंटचे रूग्ण सापडले होते. राज्यात JN.1 चे शनिवारी पुण्यात सर्वाधिक 59 रुग्ण आढळले. पुण्यातील एकूण रुग्णसंख्या 150 वर असून, राज्यातील JN.1 च्या एकूण रुग्णांपैकी 60 टक्के पुण्यात आहेत.
पुण्यासोबतच नागपूर 30, मुंबई 22, सोलापूर 9, सांगली 7, ठाणे 7, जळगाव 4, अहमदनगर 3, बीड 3, छत्रपती संभाजीनगर 2, कोल्हापूर 2, नांदेड 2, नाशिक 2, धाराशिव 2, अकोला 1, रत्नागिरी 1, सातारा 1, सिंधुदुर्ग 1 आणि यवतमाळ 1 अशी रुग्णसंख्या आहे.
राज्यात मागील 24 तासांत कोरोनाच्या 61 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यावेळी 70 रुग्ण रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.17 टक्के असून, मृत्युदर 1.81 टक्के आहे. राज्यात मागील 24 तासांत 2 हजार 728 चाचण्या झाल्याच. राज्यातील पॉझिटिव्हिटी दर 2.23 टक्के आहे.
राज्यातील आरोग्य उपसंचालक डॉ. कैलास बाविस्कर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, गेल्या 24 तासांमध्ये राज्यात एकाही कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.
पुणे महापालिकेतील आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरोना चाचण्यांची संख्या जास्त आहे. याच वेळी जेनेटिक सिक्वेंसिंगणासाठी सर्वाधिक नमुने पुण्यातून पाठवले जातायत. राज्यात JN.1 चे पुण्यात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. JN.1 हा कोरोनाचा सब-व्हेरिएंट फारसा धोकादायक नसून तो सौम्य स्वरूपाचा आहे.
केंद्रीय स्वाथ मंत्रायलयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 605 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुख्य म्हणजे 4 रूग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, कोविड संसर्गामुळे मृत्यू झाल्यांमध्ये केरळमधील दोन आणि कर्नाटक आणि त्रिपुरातील प्रत्येकी एक रुग्ण आहे. या 4 रूग्णांच्या मृत्यूंमुळे मृतांची संख्या 5,33,396 वर पोहोचलीये.