Kalyan Crime News : वारंवार विरोध करुनही बहिणीने ड्रायव्हर सोबत लग्न केले त्यामुळे संतापलेल्या भावाने गुंड पाठवून बहिणीच्या पतीला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याण रेल्वे स्टेशनवर घडली. याप्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. राधेश्याम चौधरी, इम्तियाज यासिन, आशिष कुमार प्रसाद, उमेश गौतम, अस्लम शहाबुद्दीन शेख, रिजवान अहमद, अनुप चौधरी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या कल्याण रेल्वे पोलिसांकडून या मुलीच्या भावाचा शोध सुरु आहे.
उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात अनुष्का वर्मा आपल्या कुटुंबासह राहत होती. तिचे खुदीराम चौधरी याच्याशी प्रेम संबंध होते. खुदीराम हा कामानिमित्त कल्याणजवळील बनेली येथे राहत होता. या दोघांनी सप्टेंबर 2023 मध्ये गुपचूप लग्नगाठ बांधली. या प्रेमविवाहाला कुटुंबाचा विरोध होता. खुदीराम हा ड्रायव्हर असल्याने अनुष्काच्या कुटुंबियांकडून त्याला विरोध होत होता.
यानंतर 25 एप्रिल रोजी अनुष्का ही घरातून अचानक बेपत्ता झाली. अनुष्काच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरु केला. त्यावेळी अनुष्काने एका मुलासोबत झाशीवरुन कल्याणकडे जाणारी गोरखपूर एक्स्प्रेस पकडल्याची माहिती तिच्या कुटुंबियांना मिळाली. यानंतर अनुष्काच्या भावाने याबाबत नाशिक आणि मुंबई येथे राहणाऱ्या नातेवाईक आणि मित्रांना माहिती दिली. त्यावेळी त्याने अनुष्काला परत आणा असेही त्याच्या मित्रांना सांगितले.
यानंतर अनुष्काच्या भावाचे तीन मित्र नाशिकमधून गोरखपूर एक्सप्रेसमध्ये घुसले. त्यांनी फोटोच्या आधारे एक्सप्रेसमध्ये अनुष्काचा शोध घेतला. याच दरम्यान त्यांना अनुष्का दिसली. त्यांनी अनुष्काचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळी खुदीराम याने त्यांना फोटो काढताना पाहिले. खुदीरामने या तरुणांना फोटो का काढता, याबद्दल जाब विचारला. तोपर्यंत ट्रेन कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचली होती.
अनुष्काच्या भावाचे आणखी चार मित्र कल्याण रेल्वे स्थानकावर गोरखपूर एक्सप्रेसची वाट बघत होते. ट्रेन रेल्वे स्थानकावर पोहोचताच सहा ते सात जणांनी अनुष्का आणि खोदिराम याला घेरले. त्यांनी खुदीराम याला बेदम मारहाण केली. त्यांनी अनुष्काला आपल्या दिशेने खेचले. कल्याण रेल्वे स्थानकात हा सर्व प्रकार घडत होता याची माहिती कल्याण रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानंतर कल्याण रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मारहाण करणाऱ्या सात जणांना ताब्यात घेतलं. तसेच सध्या कल्याण रेल्वे पोलिसांकडून अनुष्का वर्माच्या भावाचा शोध सुरु आहे.