Kasba Bypoll Election Result : दिवंगत आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या कसबा पेठ पोटनिवडणुक (Kasba Bypoll Election) नुकतीच पार पडली आहे. आज लागणाऱ्या निवडणुकीच्या या निकालाकडे सर्वांचेच लक्ष्य लागले आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने (hemant rasane) यांच्यात निवडणुकीआधी चुरसीची लढत पाहायला मिळत होती. मात्र आता रवींद्र धंगेकर यांनी मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. दुसरीकडे या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर आता महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे.
"जनेतेमध्ये जो रोष होता, माझ्यावर जो अन्याय झाला आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यावर ज्याप्रकारे कुरघोडीचे राजकारण केलं त्याविरोधात दाद मागण्यासाठी मी कसबा गणपतीसमोर आंदोलन केले होते. अजूनही निवडणूक आयोग ऐकत नाहीये. तरीही माझ्यावर गुन्हा दाखल झाला. माझी एकच मागणी आहे पाच वाजल्यानंतर मुख्यमंत्री फिरत होते याची शासकीय नोंद आहे तरी त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला जात नाही या विचारात मी पडलो आहे. निकाल काही लागला तरी मी निवडणूक आयोगाविरोधात कोर्टात जाणार आहे," असा इशारा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.
"लोकांनी पैसे घरात ठेवले आणि ह्रदयातला धंगेकर काढून मतदानाला आले. महाविकास आघाडीच्या विजयाची इथून सुरुवात झाली आहे. ती राज्यातही सत्ता घेणार आहे. भाजपाला जनतेनं कात्रजचा घाट दाखवलाय", असे विधान रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.
नेमकं काय घडलं?
कसबा पोटनिवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर भाजपने पैसे वाटप केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. कॉंग्रेसने हा व्हिडीओ पोस्ट केला होता. व्हिडीओमध्ये पैशांचे बंडलं आणि भाजपच्या नावच्या स्लीप दिसत होत्या. त्यानंतर कसब्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे कसबा गणपतीसमोर उपोषणाला बसले होते.