कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांना हा अर्थसंकल्प सादर केला. सन २०१९-२० साठी एकूण १ हजार ९३७ कोटी ९९ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. शिवाय शिलकीचा अर्थसंकल्प असल्यानं उत्पन्न वाढवण्याचं उद्दिष्ट महापालिकेनं ठेवलं आहे. दरम्यान, या मुख्य अर्थसंकल्पासोबत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा अर्थसंकल्पही आज सादर करण्यात आला. यावेळी परिवहन सभापती सुभाष म्हस्के यांनी त्यांच्या निवेदनात त्यांचाच सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले.
केडीएमसीचे सत्ताधारी आणि प्रशासन हे दोघंही मिळून परिवहन उपक्रमाला दिवाळखोर म्हणून बदनाम करत आहेत. जगात कुठलीही परिवहन सेवा फायद्यात नाही, मात्र अशावेळी आमची पालकसंस्था असलेली केडीएमसी आमच्या कामगारांच्या पगारासाठीही पैसे देत नसल्याची खंत सभापती म्हस्के यांनी व्यक्त केली. तर या परिस्थितीबाबत स्थानिक आमदार, खासदार, शासन, प्रशासन या सगळ्यांकडे दाद मागूनही काहीही फरक पडत नसल्यानं आमच्याच सत्तेच्या काळात आम्हाला दुजाभाव मिळत असल्याची उद्विग्नता म्हस्के यांनी भर सभेत व्यक्त केली.