आतिष भोईर, कल्याण : कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या केवळ 18 ते 44 वयोगटाचेच लसीकरण होणार असून लसीकरणापूर्वी उपस्थित नागरिकांची अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. कल्याणच्या लालचौकी येथील आर्ट गॅलरी येथील लसीकरण केंद्रावरच हे लसीकरण होणार असून त्यापूर्वी त्यांची अँटीजन टेस्ट होणार असल्याची माहिती केडीएमसीच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी आश्विनी पाटील यांनी दिली आहे.
कल्याणच्या आर्ट गॅलरी लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. मात्र याठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची अँटीजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अहमदनगरमध्ये याआधी लसीकरण केंद्रावर कोरोनाची रॅपीड अँटीजन टेस्ट करण्यास सुरवात झाली आहे. लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्याआधी अँटीजन टेस्ट केली जात आहे. लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी होत असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे.
पॉझिटिव्ह असल्यास त्या व्यक्तीला लस देऊन उपयोग नाही. व्यक्ती जर पॉझिटिव्ह आला तर त्याला लगेच आयसोलेट करता येईल. ज्यामुळे प्रादुर्भाव थांबविता येईल. त्यामुळे रॅपिड अँटीजन चाचणी करण्यात येत आहे.