योगेश खरे, झी मीडिया, नंदुरबार : कोकणातील रायगड जिल्ह्याच्या संस्कृतीचा भाग बनलेल्या पोपटीचा मोसम सुरू झाला आहे. आता थंडी संपेपर्यंत म्हणजे अगदी मार्च अखेरपर्यंत हा पोपटीचा मोसम असाच सुरू राहील. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर परिसरातील आदिवासी परिसराची ही शेकोटी तर आहेच मात्र या शेकोटीत खड्डा चिकनही तयार होत असते. खड्डा चिकन हे नुसते नाव जरी ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील संस्कृती आणि खाद्यपरंपरा या कधीही वाखाणण्यासारखे आहे. इथल्या पहाडाखाली कुठलाही तेल न लावता अगदी नैसर्गिक पद्धतीने खड्डा कोंबडी शिजवली जाते.आदिवासी बांधवांनी जपलेली लज्जतदार परंपरा आपल्याला या सातपुडा भागात पाहिला मिळते.
इथली चिकन शिजवण्याची पद्धत आदिम संस्कृतीसारखी आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरनेनुसार चिकन बनवणे हे इथले विशेष म्हणावे लागेल. सुरूवातीला कोंबडी गरम पाण्यात पिसांसह टाकून सोलण्यात येते. त्यांनतर तिला गरम ज्वाळावर जाळणार नाही इतपत भाजण्यात येते नंतर लेग पिस कलेजी असे तिचे तुकडे करून तिला काही वेळ मसाला लावून सागाच्या पानामध्ये झाकण्यात येते. सागाची पाने साठवून वाळवली जातात आणि कोरडी झाल्यानंतर त्यांचा वापर हा खड्डा चिकन तयार करण्यासाठी केला जातो. याच पानांचा वापर खड्डा चिकन शिजवण्यासाठी केला जातो. मोठी मोठी पाने सुरुवातीला घेतली जातात. निखारे असलेल्या या खड्ड्यांमध्ये चिकन ठेवले जाते.
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तेलाचा वापर करण्यात येत नाही. यात वापरला गेलेला मसाला ही आदिवासी पद्धतीचा घरी वाटून तयार करण्यात आलेला असतो. खड्ड्यात सागाचं पान निखाऱ्यावर टाकण्यात येतं आणि त्यावर लोखंडी जाळी ठेवली जाते. त्यावर वरून गरमागरम पेटलेली लाकडे यावर टाकण्यात येतात. कोंबडीच्या जातीनुसार तिला अर्धा ते एका तास निखाऱ्यावर शिजविण्यात येते. निखारे राख काढून वाफाळलेली विना तेलाचे हे चिकन पीस तोंडाला पाणी आणतात.