पुणे : पुणे- बंगळुरू महामार्गावर आज कोल्हापुरातील पूरग्रस्त महिलांचा उद्रेक पहायला मिळाला. पूरग्रस्तांना शासनाने तात्काळ मदत द्यावी या मागणीसाठी कोल्हापुरातील छत्रपती शासन संघटनेच्या महिलांनी आंदोलन केलं. या महिलांनी पुणे-बंगळुरू महामार्ग रोखून धरत महामार्गावरच चूल मांडत संसार थाटला. महिलांचा आक्रोशच सांगत होता की त्यांना सध्या कोणत्या परिस्थितीतून जावं लागतं
खासगी बॅंका आणि सावकारांचा कर्जवसुलीसाठीचा तगादा आणि पूरात झालेलं घरादाराचं नुकसान यामुळे पूरग्रस्तांचा जीव मेटाकुटीला आलाय. त्यातच सरकारकडून पूरग्रस्तांना अजूनही मदत मिळाली नाहीये. त्यामुळे या पूरग्रस्त कुटुंबांचा संताप अनावर झालाय. आम्ही जगायचं तरी कसं असा सवाल करत या महिलांनी रस्त्यावर उतरत आक्रोश व्यक्त केला.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरू असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ३० डिसेंबरपर्यंत बंदीचे आदेश लागू राहणार आहेत. नागरिकत्व सुधारणा कायदा, सावकरांबद्दलचे वक्तव्य यावरून सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात हा आदेश लागू करण्यात आला आहे.