औरंगाबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधत भाजपला देशातून हद्दपार करा अन्यथा देश उद्ध्वस्त होईल, भाजपला सत्तेतून हटवण्यासाठी राजकीय शक्तींनी एकत्र येण्याचं आवाहन चंद्रशेखर राव यांनी केलं होतं.
यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री येऊन एका राज्यातील मुख्यमंत्र्यांना भेटणे ही काही नवीन गोष्ट नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सुद्धा तेलंगणाचे मुख्यमंत्री मला येऊन भेटले होते, या सगळ्या लोकांनी मागच्या लोकसभेला सुद्धा हातात हात घालून एकत्र आले होते मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही.
उत्तर प्रदेशात आणि देशाच्या विविध राज्यात हा प्रयोग त्यांनी केला मात्र उपयोग झाला नाही. तेलंगणा मध्ये त्या पार्टी ची अवस्था बारी नाही, लोकसभेत भाजपच्या 4 जागा तिथं निवडून आल्या पुढच्या निवडणुकीत आम्ही तिथला सगळ्यात मोठा पक्ष असू असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
राज्यात सुडाचं राजकारण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्याची मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. यावर बोलताना राज्यात सुडाचं राजकारण सुरु असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. रोज काय होतं आहे ते सगळे उघड्या डोळ्यांनी पाहताय, राणेंवर त्यांच्या मुलांवर किरीट सोमय्यांवर, रवी राणा यांच्याबाबत काय सुरुय लोक पाहताय. त्यांची निराशा या सूडाच्या राजकारणातून बाहेर पडतेय असं ही फडणवीस म्हणाले.