सोनू भिडे, नाशिक- महिलांच्या सौन्दर्यात भर टाकणारे अनेक आभूषण आहेत. यात सर्वात महागडे म्हणजे सोन्याचे दागिने मात्र याहीपेक्षा मौल्यवान म्हणजे महिलांचे लांबलचक केस. हेच वाढवलेले सुंदर केस कापणे महिलांच्या जीवावर येते. मात्र नाशिकमधील (nasik) एका ८ वर्षाच्या रिशा राठी या लहानग्या मुलीने केस दान केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कर्करोगावर ( cancer) उपचार म्हणजे केमोथेरपी.
केमोथेरपी करत असताना रुग्णाच्या डोक्यावरील केस गळायला लागतात. यामुळे आपण कुरूप दिसण्याच्या भावनेने रुग्णांचे मानसिक खच्चीकरण होत असते. त्यामुळे विशेषतः महिलांना केसटोप( haircap) बनवून त्यांचे सौदर्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न असतो. या रुग्णांना मानसिक आधार देण्यासाठी महिलांकडून केस दान करण्याचा उपक्रम राबविला जातो. अनेक महिला पूर्णपणे टक्कल करून आपले संपूर्ण केस दान करतात.
रीशाने का केले केस दान
उद्योजक हेमंत राठी यांची सून डॉ. मेघा राठी यांनी एक वर्षांपूर्वी कॅन्सरग्रस्त रुग्णांना साहाय्य म्हणून केस दान केले होते. त्या या चळवळीत सहभागी होऊन अनेक महिलांना सतत प्रेरित करत असत. घरातील आईची या मोहिमेसाठी असलेली तळमळ बघून आठ वर्षाची मुलगी रीशा आनंद राठीने (Risha Rathi) ही हा विचार आपल्या आईसमोर मांडला आणि मग कुटुंबाने त्याला होकार देत वाढदिवसानिमित्त केस दान करण्याचा निर्णय घेतला. तिचे १३ इंच लांबीचे केस कापून महिलांसाठी काम करणाऱ्याा 'हेअर फॉर होप इंडिया' 'प्रोटेक्ट युवर मॉम आशिया' या संस्थेस नाशिक लेडीज सर्कल ११९ च्या माध्यमातून केस दान केले.
मुलांना केले आवाहन
रिशा अशोका युनिव्हर्सल स्कुलची विद्यार्थिनी...सधन कुटुंबात वावरत असताना आपण समाजाचं देणं लागतो ही कुटुंबातील आजोबांची भावना नातीत वृद्धिंगत झाली. आईने केस दान केल्याने कर्करोगग्रस्त रुग्णांना बळ मिळत असेल तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी केस दान करण्याच आवाहन आता रीशाने केल आहे. शाळेत आणि तिच्या सर्व मित्रामध्ये तिच्या या सामाजिक बांधीलकीमुळे आता ती कौतुकाचा विषय ठरली आहे .