अंबाबाई विकास कॉरिडॉरचा वाद; विश्वासात घेऊन योग्य पुनर्वसन करण्याची स्थानिकांची मागणी

साडेतीन शक्तीपीठापैकी महत्त्वाचे पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिराचा विकास व्हावा यासाठी सर्वच पातळीवर प्रयत्न केला जात आहे. मात्र, विकासाआधीच वाद सुरु झाला आहे. 

Updated: Sep 14, 2023, 11:24 PM IST
अंबाबाई विकास कॉरिडॉरचा वाद; विश्वासात घेऊन योग्य पुनर्वसन करण्याची स्थानिकांची मागणी title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : वाराणसी आणि मथुरा कॉरिडॉरच्या धर्तीवर कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराचा विकास करण्याची योजना कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं हाती घेतलीय. मात्र, या विकासकामात अनेक दुकानं आणि घरांच्या भूसंपादनावरून नवा वाद सुरू झालाय.  नेमका काय आहे हा  वाद जाणून घ्या. 

कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक. श्री करवीर निवासिनी अंबाबाई महालक्ष्मी मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनानं महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतलीय. त्यासाठी अंबाबाई मंदिर विकास कॉरिडॉरचा आराखडा तयार करण्यात आलाय.

कसा असेल अंबाबाई विकास कॉरिडॉर? 

अंबाबाई विकास कॉरिडॉर नुसार बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, वस्त्र सजावट आणि भव्यराज स्नान पॉईंट परिसराचा विकास केला जाणार आहे. त्यादृष्टीनं तब्बल 240 घरमालक आणि दुकान गाळा मालकांना भूसंपादनासाठी नोटिसा बजावण्यात आल्यात यापैकी 180 मिळकतदारांनी सकारात्मक उत्तर दिलंय

मात्र, अंबाबाई मंदिर विकास आराखड्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. ज्यांची घरं आणि दुकानं जाणार आहेत, त्यांना मोबदला किती मिळणार, याबाबत अंधारात ठेवलं जात असल्याचा आरोप संबंधितांनी केलाय. मंदिर विकासाच्या नावाखाली आम्हाला भकास करू नका, अशी भूमिका त्यांनी घेतलीय.

श्री अंबाबाई मंदिराचा विकास करून भाविकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मंदिर विकासाला कोल्हापूरकर नागरिक आणि व्यापा-यांचा विरोध नाही. मात्र, हा विकास कॉरिडॉर राबवताना प्रशासनानं पारदर्शी कारभार करावा आणि संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य पुनर्वसन करावं, अशीच त्यांची भूमिका आहे. तसं झालं तरच अंबाबाई मंदिर विकासाला गती मिळेल.