श्रीकांत राऊत / यवतमाळ : कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी यवतमाळमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून असलेले कठोर निर्बंध आजपासून शिथिल होताच शहरासह जिल्ह्यातील ओस पडलेली बाजारपेठ गर्दीने (Market Crowd) गजबजली. सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सर्वच दुकाने सुरू ठेवण्याची मुभा प्रशासनाने देताच बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी प्रचंड झुंबड केली. (Location : citizens rushed to the market for shopping at Yavatmal)
परिणामी शहरातील इंदिरा गांधी मार्केट, मेन लाईन, नेताजी मार्केट, दत्त चौक, आर्णी मार्गावर वाहतूक कोंडी झाली. सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने व्यापाऱ्यांसह नागरिकही सुखावल्याचे दिसून आले. परंतु कोरोनाची दुसरी लाट संपली या भ्रमात न राहता नागरिकांनी धोका अजून टळलेला नसल्याने योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक ठरत आहे.
दरम्यान, याआधी यवतमाळ जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना अनेक नागरिक कठोर निर्बंधातही विनाकारण घराबाहेर पडत होते. अशा लोकांची रस्त्यावरच कोरोना चाचणी केल्या होत्या. महसूल, आरोग्य व पोलीस पथकाने संयुक्त मोहीम हाती घेऊन यवतमाळ शहरात प्रमुख मार्गांवर फिक्स पॉईंट तयार करुन याठिकाणी अत्यावश्यक कारणाविना फिरस्तीवर निघालेल्यांची चौकशी सुरु केली होती. त्यांचेवर दंडात्मक कारवाई करुन जागेवरच त्यांची कोरोना चाचणी देखील केल्या होत्या. यावेळी चाचणीत पॉझिटिव्ह आढळणाऱ्या व्यक्तीला थेट कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केल्या होत्या.
तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सुरु केलेल्या या धडक मोहीमेमुळे अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर चाप बसला होता. एकाच वेळी 10 पॉइंटवर होणाऱ्या या कारवाईमुळे कोरोना चाचणी वाढली होती. यात 10 टक्के नागरिक पॉझिटिव्ह आढळत होते. आता पुन्हा लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर खरेदीसाठी बाजारात नागरिक गर्दी करत असल्याने कोरोनाला निमंत्रण मिळेल, त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू करावेत, अशी मागणी होताना दिसत आहे.
तर दुसरीकडे 15 वर्ष वयोगटातील बालकांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर तसेच त्यांच्यात कोविडचे प्रतिपिंड तयार झाल्यानंतर त्यांना मल्टिसिस्टम इन्फ्लोमेटरी सिंड्रोम म्हणजेच पोस्ट कोविड (एमआयएससी) या आजाराची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत असल्याचे यवतमाळचे बालरोग तज्ज्ञ तथा आयएमएचे अध्यक्ष डॉ. संजीव जोशी यांनी सांगितले आहे. बालकांसाठी डॉ जोशी यांनी कोविड रुग्णालय सुरु केल्यानंतर त्यांनी उपचार केलेल्या बालकांमध्ये या आजाराची लक्षणे असलेली सहा बालके आतापर्यंत आढळून आली आहेत. योग्य निदान व वेळेत उपचार झाल्यास बालक बरे होऊ शकतात अन्यथा त्यांची प्रकृती गंभीर होण्याचा धोका आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याचे सांगण्यात येत आहे.