दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई : मुंबईत आता लोकसभा निवडणूकीसाठीचा प्रचाराला वेग आला आहे. दक्षिण मुंबईतही आघाडी आणि महायुतीकडून मतदारांना प्रभावित करण्याचा जोरदार प्रयत्न सुरु आहे. एकेकाळी मराठी मतदारांचे वर्चस्व असलेला दक्षिण मुंबई मतदारसंघ आता बहुमिश्रित मतदारांचा झाला आहे. मराठी भाषिकांची संख्या कमी होऊन अमराठी टक्का दक्षिण मुंबईत वाढला आहे. याच जैन,मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. म्हणूनच शिवसेनेचे विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि काँग्रेसचे माजी खासदार मिलींद देवरा यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. एका बाजूला अरविंद सावंत यांच्यासाठी मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस सभा घेत आहेत तर मिलिंद देवरा हे देखिल मतदारसंघ पिंजून काढत आहेत.
कुलाबा, मुंबादेवी, भायखळा, मलबार हिल,शिवडी,वरळी हे सहा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात मोडतात. यातच झवेरी बाजार,मलबार हिल या भागात जैन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. भेंडी बाजार,भायखळा या परिसरात मुस्लिम मतदार तर लालबाग,शिवडी या ठिकाणी मराठी मतदार लक्षणीय आहे. एकूण 36 नगरसेवकांपैकी त्यात 18 शिवसेनेचे,10 भाजपचे, 6 काँग्रेसचे, अखील भारतीय सेना 1, समाजवादी पक्षाचे 1 असे नगरसेवक आहेत.
मुकेश अंबांनींचा पाठीबा असला तरी एका व्यक्तीने मतदारसंघ जिंकता येत नाही असा टोला शिवसैनिकांनी लगावला आहे.
त्यात जैन धर्मियांवरुन प्रचार केल्याप्रकरणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. याची दखल निवडणूक आयोगाने घेत देवरांना नोटीस पाठवली. काँग्रेसचे मिलिंद देवरा विरुद्ध शिवसेनेचे अरविंद सावंत अशी थेट लढत दक्षिण मुंबईत पहायला मिळणार आहे. मतदार कुणाला कौल देतात हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.