Beed Lok Sabha Election 2024, Pankja Munde Vs Bajarang Sonavane: बीड लोकसभा मतदार संघातून भाजपने पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांचे चाहते आनंदात आहेत. पक्षाकडून सतत डावलले जात असताना लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळाल्यानंतर पंकजा मुंडेही जोमाने कामाला लागल्या आहेत. बीड जिंकून त्यांना स्वत:चे नेतृत्व सिद्ध करायचे आहे. यांची लढत होणार आहे ती शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांच्याशी.
बजरंग सोनावणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे समर्थक मानले जात. पण त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन घड्याळ सोडून हाती तुतारी घेतली आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रीतम मुंडेंविरुद्ध 5 लाखांपेक्षा अधिक मत घेतली होती. त्यामुळे पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग सोनावणे ही लढत रंगतदार होणार एवढं मात्र नक्की. दरम्यान या दोन्ही उमेदवारांपैकी कोणाकडे किती संपत्ती आहे? कोण कितवी शिकलंय? याबद्दल जाणून घेऊया.
पंकजा मुंडे यांनी लोकसभा उमेदवारी अर्ज भरताना जाहीर केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे एकूण 6 कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपयांची चलसंपत्ती आहे. तसेच आपल्याकडे 32 लाख 85 हजार रुपयांचे सोने तर 3 लाख 28 हजार रुपये किंमतीची चांदी असल्याचे जाहीर केले आहे.
पंकजा मुंडे यांचे पती चारुदत्त पालवे यांच्याकडे 13 लाख रुपये किंमतीचे सोने आणि 1 लाख 38 हजार रुपये किंमतीची चांदी आहे. चारुदत्त पालवे यांनी डॉक्टर प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे. तर यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी 2019 च्या निवडणुकीत सादर केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 3 कोटी 59 लाख 16 हजार 530 रुपयाची संपत्ती आहे. 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून ते लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यांच्याकडे 3 ट्रॅक्टर, 1 टँकर आणि 1 हार्वेस्टर आहे. तसेच त्यांच्याकडे 2 लाख 19 हजार रुपये किंमतीचे सोने आहे. यासोबतच आपल्यावर 6 कोटी 93 लाख 18 हजार 112 रुपयांचे कर्ज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बजरंग सोनावणे यांनी आपल्या पत्नीच्या संपत्तीची माहितीदेखील जाहीर केली होती. त्यानुसार त्यांची पत्नी सारिका यांच्याकडे 2 कोटी 87 लाख 24 हजार रुपयांची संपत्ती आहे. सारिका यांच्यावर 72 लाख 82 हजार 969 रुपयांचे कर्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांनी सादर केलेल्या संपत्तीच्या आकडेवारीनुसार त्यांच्या संपत्तीमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये 10 कोटी 67 लाख रुपयांची वाढ झाली आहे. यासोबत त्यांच्या कर्जाच्या किंमतीतही वाढ झाल्याची नोंद आहे. पंकजा आणि त्यांच्या पतीने मिळून घेतलेल्या कर्जाची आकडेवारी 9 कोटी 94 लाखांनी वाढल्याची माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे बजरंग सोनावणे यांच्या संपत्तीत मागच्या 5 वर्षात 63 टक्क्यांनी वाढ झाल्याचे समोर आले आहे. आपल्या संपत्तीत 17 कोटी 52 लाख 77 हजार 568 रुपयांनी वाढ झाल्याची माहिती त्यांनी 2019 च्या शपथपत्रामध्ये दिली होती.