मुंबई : भाजपाकडून शुक्रवारी रात्री लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे लोकसभा मतदारसंघासह राज्यातील सहा मतदारसंघांचा समावेश आहे. पुण्यातून लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. मात्र, या सगळ्यात पालकमंत्री गिरीश बापट उजवे ठरले असून पक्षाने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली आहे. भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पुण्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. वेळ पडल्यास त्यांनी अगदी काँग्रेसमध्ये जाण्याची तयारीही ठेवली होती. मात्र, गेल्या दोन दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतल्यामुळे सर्व चक्रे फिरली. देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढल्यानंतर संजय काकडे यांनी आपले बंड मागे घेतले असून भाजपचा प्रचार करू, असे जाहीर केले. उमेदवारी मिळवण्याच्या या संपूर्ण प्रक्रियेत गिरीश बापट सुरुवातीपासून कोणतेही भाष्य करणे टाळले होते. मात्र, ऐनवेळी उमेदवारीची माळ त्यांच्या गळ्यात पडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उर्वरित पाच मतदारसंघांपैकी जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरीतून भारती पवार, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. दुसऱ्या यादीत राज्यातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. यात पुण्यातील विद्यमान खासदार अनिल शिरोळे, सोलापूरचे शरद बनसोडे, जळगावचे ए. टी. पाटील आणि दिंडोरीचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा समावेश आहे. तर माढा आणि ईशान्य मुंबईतील उमेदवारांबाबत भाजपाने सस्पेन्स कायम ठेवला आहे. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढला आहे.
BJP releases list of 36 candidates from Andhra Pradesh, Assam, Maharashtra, Odisha. Girish Bapat to contest from Pune (Maharashtra), Sambit Patra to contest from Puri (Odisha). #LokSabhaElections2019 pic.twitter.com/Ft3C3cl1cX
— ANI (@ANI) March 22, 2019
तर देशपातळीवर विचार करायचा झाल्यास भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांना ओदिशातील पुरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने गुरुवारी पहिली यादी जाहीर केली होती. वाराणसीमधून नरेंद्र मोदींना उमेदवारी देण्यात आली आहे तर गांधीनगरमधून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह १८४ जणांचा समावेश आहे.